

मुंबई : अपघात घडण्यासाठी दुसर्या वाहनाचा सहभाग आवश्यक नाही. मोटारसायकल घसरणेदेखील अपघात ठरतो. त्यामुळे अशा अपघातातील पीडित व्यक्ती मोटार वाहन कायद्यांतर्गत भरपाई मिळण्यास पात्र ठरते, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.
न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी अपघाती मृत्यू झालेल्या विवाहित महिलेच्या कुटुंबीयांना 7,82,800 रुपये भरपाई मंजूर केली. या भरपाईची रक्कम वार्षिक 7.5 टक्के व्याजदराने देण्याचे आदेश दिले आहेत.
मोटारसायकलच्या चाकात महिलेची साडी अडकली होती. त्यामुळे मोटारसायकल रस्त्यावर घसरुन अपघात झाला. त्यात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी भरपाईसाठी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. तथापि, न्यायाधिकरणाने महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास नकार दिला होता. तो आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी रद्दबातल ठरवला आणि महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई मंजूर केली.
अपघातातील मृत महिला ही पती आणि दोन लहान मुलांसह मोटारसायकलवरून प्रवास करीत होती. या प्रवासात महिलेच्या साडीचा नक्षीदार भाग मोटारसायकलच्या मागील चाकात अडकला. त्यामुळे मोटारसायकल घसरली. त्यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला. ही वस्तुस्थिती न्यायाधिकरणापुढे मांडण्यात आली होती. तथापि, इतर कोणतेही वाहन सहभागी नसल्याने याला अपघात म्हणता येणार नाही, असा निर्णय मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाने दिला होता. तो निर्णय न्यायमूर्ती डिगे यांनी चुकीचा ठरवला.
मोटार वाहन कायद्यात अपघात या शब्दाची व्याख्या केलेली नाही. लेक्सिस नेक्सिसनुसार, अपघात म्हणजे व्यक्तीला हानी पोहोचवणारी अचानक किंवा अनपेक्षित घटना. त्यात टक्कर होणे, गाडी उलटणे किंवा घसरणे यांचा समावेश आहे. अपघात घडण्यासाठी दुसर्या वाहनाचा सहभाग असणे आवश्यक नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती डिगे यांनी नोंदवले आणि महिलेच्या कुटुंबियांना 7,82,800 रुपयांची भरपाई 7.5 टक्के व्याजदराने देण्याचे निर्देश दिले.