

मुंबई : सायलेंट किलर असलेल्या उच्च रक्तदाब या आरोग्य समस्येची तरुणाई शिकार बनत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या दोन वर्षांत 25 लाख नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये 1 लाख 40 हजार जणांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. 22 ते 30 वयोगटातील 25 टक्के तरुणांना ही समस्या असून रुग्णालयात तपासणीसाठी येणार्या दहापैकी आठ रुग्णांमध्ये हा आजार आढळत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, धूम्रपान आणि अल्कोहोल या सवयींमुळे या समस्येने तरुणाईला ग्रासले आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, अंधुक दृष्टी, छातीत दुखणे किंवा थकवा ही या याची लक्षणे आहेत. परंतु, पुरेशी माहिती नसल्याने वेळीच निदान होत नाही. त्यामुळे गुंतागुंत वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याचे वेळीच निदान होत नसल्याने ते जीवावरही बेतत आहे. हृदयरोग, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढत असल्याने नियमित तपासणी करून याकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
लीलावती रुग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. सी. सी. नायर म्हणाले की, उच्च रक्तदाब असलेल्या अनेक तरुणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. यामुळे नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. जर रक्तदाब नियंत्रणात ठेवला नाही, तर कालांतराने तो इतर अवयवांवर परिणाम करू शकतो. रुग्णालयात येणार्या 10 पैकी 8 जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे.
फिजिशियन डॉ. छाया यांनी सांगितले की, उच्च रक्तदाबाची समस्या ही 22 ते 30 वयोगटात अधिक आहे. हा आजार हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि दृष्टीवर परिणाम करू शकतो, जर एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्याने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबईकर प्रतिदिन 9 ग्रॅम मिठाचे सेवन करीत असल्याचे एका पाहणीत आढळले आहे. त्यामुळे मिठाचे सेवन योग्य प्रमाणात करा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्ताने महापालिकेतर्फे ‘मीठ व साखर जनजागृती’ अभियान (हेल्दी खा, स्वस्थ रहा, मस्त रहा) राबविण्यात येत आहे. यात मुंबईकरांमध्ये आहारातील मीठ व साखरेचे प्रमाण कमी करण्याची सवय निर्माण करणे. पदार्थांचे आवरण (फूड लेबल) वाचण्याची सवय लावून सूचित आहार निवडीसाठी प्रवृत्त करणे तसेच प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांचे मर्यादित सेवन करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
नियमित व्यायाम
योगा आणि मेडिटेशन
पौष्टिक आहार
नियमितपणे तपासणी
धूम्रपान, मद्यपान
मिठाचे अधिक सेवन
अपुरी झोप