

दिनेश कांबळे
डोळखांब : शहापूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणार्या भातसा धरणाची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्गही बंद करण्यात आला आहे.
या धरणातून मुंबई शहराला साडेचार हजार दलघमी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणाच्या पाणीसाठ्याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून असते. मागील आठवड्यात शहापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण ओसंडून वहात होते.यामुळे धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले होते. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तर शासकीय प्रथेनुसार जलपुजनही करण्यात आले होते.
यानंतर काही दिवसातच तालुक्यात पावसाने दडी मारल्याने धरणाची पाणी पातळी खालावली आहे. याठिकाणी पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. जुलैअखेर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर ऑगस्ट महिनाभर विसर्ग सुरू ठेवला जातो. परंतु पावसाने दडी मारल्याने तत्काळ विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर पाच मिटरने पाणीपातळी खालावली आहे.
शनिवारी धरण क्षेत्रात केवळ 20.00 मिमी पावसाची नोंद झाली तर आतापर्यंत पडलेल्या पावसाचे प्रमाण 880.832 मीमी आहे. धरणाची सध्याची पाणीपातळी 138.52 मी. ऐवढी झाली आहे. तर उपयुक्त पाणीसाठा 846.832 दलघमी ऐवढा आहे. सद्या 89.88 टक्के येवढा पाणी साठा धरणात आहे. तर सांडवा , सिंचन, विद्युतगृह विसर्ग शुन्य क्युसिएस येवढे आहे.