पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढील २ ते ३ दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्राचा आणखी काही भाग आणि बिहारच्या काही भागांतून मान्सूनच्या माघारीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. दरम्यान, ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra Weather) काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
तर आठवडाभर कोकण आणि गोव्यात विखुरलेल्या स्वरुपात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासांदरम्यान कोकण, गोवा, कर्नाटकचा किनारपट्टी भाग आणि अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तामिळनाडू, कर्नाटकचा अंतर्गत भाग, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, पश्चिम बंगालचा उप-हिमालयीन भाग आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.
लक्षद्वीप आणि लगतच्या आग्नेय आणि पूर्वमध्य अरबी समुद्रात आज (दि. ९ ऑक्टोबर) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते पुढील ३-४ दिवसांत वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मध्य अरबी समुद्रात त्याचे रुपांतर तीव्र कमी दाब क्षेत्रात (Depression) होईल. या पार्श्वभूमीवर केरळ आणि तामिळनाडूमध्ये आठवड्याभरात आणि पुढील ३ दिवसांत महाराष्ट्राच्या किनारपट्टी आणि घाट भागात तसेच ईशान्य भारतात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.