

मुंबई : वातावरणात अचानक बदल झाल्याने वीकेंडला मुसळधार पावसाची शक्यता आहे.भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शुक्रवारी पावसाचा ग्रीन अलर्ट दिला होता. मात्र, वातावरणात अचानक बदल झाल्याने दुपारनंतर ग्रीनचे यलो अलर्टमध्ये रूपांतर करण्यात आले.
पावसाला अनुकूल वातावरण तयार झाल्याने पश्चिम उपनगरात अंधेरी तसेच डोंबिवलीमध्ये जोराच्या सरी बरसल्या. मात्र, शहरामध्ये ढगाळ वातावरण होते. काही तुरळक पाऊस पडला. यलो अलर्टचा परिणाम शनिवारी सकाळपर्यंत राहण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सरासरी किमान तापमान 31 अंश सेल्सिअस इतके आहे. शुक्रवारी किमान 26 आणि कमाल 30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील तीन दिवस कमाल तापमानात एका अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी तुरळक सरी पडल्याने दुपारी प्रचंड उष्मा जाणवत आहे. शुक्रवारी आर्द्रतेचे प्रमाण 95 टक्के इतके होते.