

मुंबई : राज्यात उन्हाच्या तडाख्यासोबत ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. सध्या 411 गावे आणि 1,114 वाड्यांना 466 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक गावांमध्ये विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्याने नागरिकांना दररोज टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
महिलांना पहाटेपासूनच पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून, काही ठिकाणी पाण्यावरून वादही होत आहेत. राज्यातील पाणीटंचाई व्यापक होत असून, नाशिक, पुणे, अहमदनगर आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ताण आहे. टँकर हा तात्पुरता उपाय ठरत असला, तरी दीर्घकालीन जलव्यवस्थापनाशिवाय हा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. शासनाच्या साप्ताहिक अहवालानुसार, नाशिकमधील 131 गावे आणि 456 वाड्यांना 128 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
यंदा पाऊस सरासरीपेक्षा किंचित कमी असेल, असे अंदाज यापूर्वीच व्यक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापासूनच जलव्यवस्थापन करण्याचे निर्देश नुकतेच प्रशासनाला दिले आहेत. याचबरोबर जनावरांसाठी चार्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
नाशिक : 131 गावे, 456 वाड्या, 128 टँकर
पुणे : 34 गावे, 184 वाड्या, 63 टँकर
सातारा : 45 गावे, 146 वाड्या, 34 टँकर
सांगली : 48 गावे, 111 वाड्या, 34 टँकर
अहिल्यानगर : 38 गावे, 168 वाड्या, 32 टँकर
छत्रपती संभाजीनगर : 69 गावे, 339 वाड्या, 67 टँकर
जालना : 52 गावे, 96 वाड्या, 32 टँकर
बीड : 19 गावे, 20 वाड्या, 36 टँकर
ठाणे : 27 गावे, 103 वाड्या, 30 टँकर
रायगड : 31 गावे, 104 वाड्या, 50 टँकर
पालघर : 43 गावे, 99 वाड्या, 28 टँकर