

मुंबई ः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार गंभीर असल्याने त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना शुक्रवारी पाठवलेल्या पत्रात सपकाळ यांनी म्हटले आहे की, कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 व 227 मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर व वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी नार्वेकर हे स्वतः तेथे उपस्थित होते. त्यांनी पोलिसांच्या माध्यमातून भाजप उमेदवारांविरोधात अर्ज दाखल करणाऱ्या विरोधी उमेदवारांना धमकावले आणि अर्ज भरण्यापासून रोखले. हे अत्यंत गंभीर आहे.
आपचीही तक्रार
ए वॉर्ड कार्यालयात 30 डिसेंबर रोजी दुपारी 4 च्या सुमारास आप उमेदवार मार्गारेट दा कोस्टा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उपस्थित होत्या. अर्ज भरण्याच्या मुदतीपूर्वीच त्यांनी अनामत रक्कम भरून त्याची पावती घेतली. त्यांना टोकनही देण्यात आले. मात्र; नार्वेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या की, इतर कोणत्याही उमेदवाराला या दालनात प्रवेश देऊ नये, असा आरोप आपच्या प्रिती मेनन यांनी केला आहे.