

मुंबईः पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार? असा सवाल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेले वक्तव्य अशोभनीय आणि अत्यंत हास्यास्पद आहे, या विधानाचा मी जाहीर निषेध करतो, असेही सपकाळ म्हणाले.
संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरूंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रिपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे. मात्र दलित, मुस्लिम किंवा महिलेस संघाच्या सरसंघचालकपदी कधी नियुक्त करणार, अशा शब्दांत सपकाळ यांनी मोदींवर टीका केली. मोदी यांनी हिंदू-मुस्लिम, दलित सवर्ण-ओबीसी यांच्यात द्वेष निर्माण करण्याचेच काम केले आहे. पण मोदींनी गेल्या ११ वर्षांत एकाही मुस्लिम महिलेला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री केले नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात मुस्लिम आणि दलितांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यांचे लिचिंग केले जात आहे. ते रोखण्यासाठी मोदींनी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांच्या कोरड्या भाषणबाजीला काही अर्थ नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या मुस्लिम अध्यक्ष नियुक्त करण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.