
अंकली : एका दिवसावर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. विठुमाऊलीच्या नावाचा गजर सुरू आहे. संत तुकोबा आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात हजारो वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत.
अवघ्या महाराष्ट्राची माऊली असलेल्या विठ्ठलाचे एक मंदिर कर्नाटकातही आहे. तसं पाहायला गेलं तर विठ्ठलाला कानडा विठ्ठल असंही म्हणतात. ‘कानडाऊ विठ्ठलू.... कर्नाटकू....’ असा उल्लेख अभंगात आढळतो. विठ्ठल कर्नाटकातून पंढरपुरात येऊन येथेच राहिला, असेही म्हटले जाते. आजही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या प्रतीक्षेत हंपीतील एक मंदिर उभे आहे.
कर्नाटकातील हंपी या गावात हे मंदिर आहे. अतिशय सुंदर आणि स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. तुंगभद्रा नदीच्या काठावर हे हंपी शहर वसले आहे. हंपीत अनेक मंदिरे आहेत. उत्कृष्ट कोरीव काम केलेली ही मंदिरे डोळ्यांचे पारणे फेडणारी आहेत. प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी होती.
हंपी येथील वीरुपाक्ष मंदिर म्हणजे विठ्ठलाचे हे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाला आहे. या मंदिराचे बांधकाम 15 व्या शतकात कृष्णदेवराय यांनी केले होते. या मंदिराला विजया विठ्ठल मंदिर म्हणूनही ओळखले जाते. 56 दगडी स्तंभावर हे मंदिर उभारले आहे. या 56 दगडी स्तंभावर हाताने थाप मारल्यानंतर ध्वनी निर्माण होतो. या मंदिराच्या परिसरात असलेला दगडी रथ हे मुख्य आकर्षण आहे.
मंदिरात एकामागे एक चार पीठ आहेत. रथ पीठ, ध्वज पीठ, ज्योती पीठ, डाली पीठ आणि तुळशी वृंदावन. रथ पीठ म्हणजे दगडी रथ. त्यात विष्णूचे वाहन गरुड विराजमान आहेत. हा रथ म्हणजे हंपीमधील केंद्रबिंदू आहे. या दगडी रथाची चाके फिरून त्यामधून भगवान गरुड विष्णूला वंदन करायला जातात, अशी आख्यायिका आहे.
मध्यभागी असलेल्या महामंडपात विठ्ठल मंदिर असून, मंदिरातील गाभार्यात पूर्वी विठ्ठलाची मूर्ती होती; पण आज गाभार्यात मूर्ती नाही. आता ती मूर्ती महाराष्ट्रातील पंढरपुरात असल्याचे म्हटले जाते. मूर्ती तेथे नसली तरी मंदिराचे पावित्र्य आजही जपले आहे.
आपल्या विठ्ठलासाठी कर्नाटकात मंदिर का बांधले गेले असेल, असा प्रश्न पडतो. त्यामागे एक आख्यायिका सांगितली आहे की, राजा कृष्णदेवराय यांनी पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती हंपीतील मंदिरात स्थापन केली होती; पण एका दिवशी विठुरायाने स्वप्नात येऊन द़ृष्टांत देत मूर्ती पुन्हा पंढरीत प्रतिस्थापित करण्यात यावी, असा आदेश दिला. त्यानुसार कृष्णदेवराय यांनी विठ्ठलाची मूर्ती पुन्हा पंढरपुरात स्थापन केली. त्यामुळे नाराज झालेल्या कृष्णदेवराय यांनी पुन्हा या मंदिरात विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही.