

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने १ सप्टेंबर रोजी देशभर राबविण्यात येणारा 'हमारा विद्यालय-हमारा स्वाभिमान' हा संस्कारक्षम उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलात आणण्याचे परिपत्रक जारी केले आहे. मात्र या उपक्रमाला हिंदी नाव का ? असा सवाल आता शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
राज्यातील शालेय विद्यार्थी व शिक्षक एकत्रितपणे याबाबत प्रार्थनेच्या वेळी सामूहिक संकल्प करणार आहेत. ज्या जिल्ह्यांना १ सप्टेंबर रोजी गौरी सणानिमित्त स्थानिक सुट्टी असेल, त्या जिल्ह्यांत हा उपक्रम २ सप्टेंबर रोजी राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने शासनाला याबाबत पत्र पाठविले होते. त्यानुसार देशभरातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थी व शिक्षक शाळेतील स्वच्छता, शिस्तबद्धता, हरितमय वातावरण, विद्यार्थ्यांमध्ये अनुशासनाची जाणीव, राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्यांचे पालन याबाबत सामूहिक संकल्प करणार आहेत. शाळेला केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम न मानता राष्ट्रीय चारित्र्य निर्मितीचे केंद्र म्हणून पाहावे, नैसर्गिक पर्यावरण व मूल्यांची जपणूक व्हावी, हा संदेश यामधून दिला जाणार आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, राष्ट्रीयभाव, सामाजिक समरसता, शालेय साधनसंपत्तीची काळजी घेण्याची भावना दृढ होईल. मात्र, या उपक्रमाच्या नावामुळे शिक्षक संघटनांत संताप व्यक्त होत आहे. देशपातळीवरील उपक्रम असला तरी तो राज्याच्या भाषेतच राबवायला हवा. मराठी शाळांसाठी उपक्रम मराठीत असावेत, अन्यथा हिंदीचे आक्रमण थांबवणे कठीण होईल, असे शिक्षक संघटनांनी स्पष्ट केले.
उपक्रम मराठी शाळांसाठी, पण शीर्षक मात्र हिंदीमध्ये का? मराठी शीर्षकासाठी शब्द नाहीत का? 'आमची शाळा-आमचा अभिमान' किती सुंदर वाटते. मग हिंदीतून नावाचा आग्रह कशासाठी?
सुशील शेजुळे, मराठी अभ्यास केंद्र.
एकीकडे अभिजात भाषा मराठीबाबत घोषणाबाजी केली जाते. दुसरीकडे 'मेरी मिट्टी मेरा देश', 'एक पेड माँ के नाम', 'हमारा विद्यालय-हमारा स्वाभिमान' असे हिंदी शीर्षक वापरून उपक्रम राबवले जातात. शिक्षण विभागाच्या या कृतीतून हिंदीसक्तीचा विचार दिसून येतो.
महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ