

मुंबई : गुजरातमधील दारूबंदी कायद्यानुसार महाराष्ट्रात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले आहेत. त्यामध्ये गुटख्याचा व्यवसाय करणार्यांवरही ‘मोका’अंतर्गत कारवाई प्रस्तावित आहे.
गुटखा व प्रतिबंधित पदार्थांवरील कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी गुरुवारी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. झिरवळ म्हणाले, गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांची राज्यात होत असलेली अवैध विक्री रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन-2025 मध्ये सभागृहात दिलेल्या आश्वासनानुसार अन्न व औषध प्रशासन आणि गृह विभाग यांचे संयुक्त पथक स्थापन करणे, अवैध गुटखा विक्री करणार्यांविरोधात ‘मोका’अंतर्गत कारवाई प्रस्तावित आहे.
गुजरातमधील दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर गुटखाबंदीसाठी महाराष्ट्रात स्वतंत्र कायदा तयार करून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसे विधेयक मांडले जाणार आहे. याद़ृष्टीने उपाययोजना सुचविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने गृह आणि विधी व न्याय विभागाच्या समन्वययाने कार्यवाही करावी, असे झिरवळ यांनी सांगितले.
विशेषत:, शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अशा प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्यास त्यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. त्याद़ृष्टीने कार्यवाही केली जावी, असे निर्देशही त्यांनी दिले.