

मुंबई : वृत्तसंस्था
प्रख्यात कवी गुलजार यांना गुरुवारी त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा देशातील सर्वात मोठा साहित्यिक सन्मान आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीतील समारंभाला 90 वर्षीय गुलजार आरोग्याच्या कारणांमुळे उपस्थित राहू शकले नव्हते.
भारतीय ज्ञानपीठचे विश्वस्त मुदित जैन, माजी सचिव धर्मपाल आणि सरव्यवस्थापक आर. एन. तेवारी यांच्या शिष्टमंडळाने या सर्वकालीन महान साहित्यिकाचा गौरव केला. गुलजार यांना सन्मानपत्र, 11 लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि वाग्देवी सरस्वतीची कांस्य मूर्ती प्रदान करण्यात आली.आज दुपारी आम्ही गुलजार यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले. गुलजार साहेब यांचे जावई गोविंद संधू, त्यांच्या पत्नी रेखा, चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि काही साहित्यिक लेखक उपस्थित होते, असे तेवारी यांनी सांगितले.
पूर्वी गुलजार यांना 2002 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण, 2008 मध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ या गीतासाठी अकादमी पुरस्कार व ग्रॅमी पुरस्कार आणि 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला आहे.
संपूरन सिंग कालरा असे खरे नाव असलेल्या गुलजार यांची याच टोपण नावाने ओळख बनली आहे. ते या युगातील एक अत्युत्तम उर्दू कवी म्हणून गणले जातात. त्यांनी परिचय, कोशिश, आंधी, माचिस, हुतूतू यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
गुलजार यांच्या मैंने तेरे लिए (आनंद), दिल ढूंढता है (मौसम), छैया छैया (दिल से) आणि ऐ हायरत ए आशिकी (गुरु) या आणि अशा अनेक गीतांनी रसिकांच्या मनात घर केले आहे.