CM Devendra Fadnavis | दुष्काळ निवारणासाठी राज्यातील १८ हजार गावांत जलपुनर्भरण

मुख्यमंत्र्यांची घोषणा; ‘जलयुक्त शिवार ३.०’ची अंमलबजावणी
CM Devendra Fadnavis |
CM Devendra Fadnavis | दुष्काळ निवारणासाठी राज्यातील १८ हजार गावांत जलपुनर्भरण
Published on: 
Updated on: 

मुंबई : पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविणे, जुन्या जलसंधारण संरचनांचे पुनरुज्जीवन करणे आणि नव्या संरचनांची निर्मिती करणे, यासाठी राज्य सरकारने व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. केंद्र सरकारच्या ‘जलसंचय-जनभागीदारी’ अभियानांतर्गत राज्यात मे २०२७ पर्यंत ३४ लाख ८३ हजार ९४० भूजल पुनर्भरण संरचनांची निर्मिती पूर्ण करण्यात येणार आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्यातील १८ हजार गावांत जलपुनर्भरण करणार असल्‍याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जलशक्ती अभियान राबविण्याबाबत ऑनलाईन बैठक पार पडली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील जवळपास ९० टक्के भाग दुष्काळाच्या झळा सोसत असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. याचे संधीत रूपांतर करण्याच्या दृष्टीने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, तलावांची दुरुस्ती, शेततळी आणि पुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती यावर विशेष भर देण्यात येत आहे. राज्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार प्रचलित निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जलयुक्त शिवार योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी १८ हजार गावांची निवड करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विविध योजनांमधील निधी आणि कामांचे एकत्रीकरण करून जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील. जलसंधारणाच्या कामांसाठी ग्रामविकास, वन, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, कृषी आणि पाणीपुरवठा विभागांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावे, असेही फडणवीस म्हणाले.

मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव आणि संबंधित विभागांच्या स्तरावर कामांचा नियमित आढावा घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जलसंधारणाच्या कामांत लोकसहभागाबरोबरच शास्त्रीय पद्धती आणि तांत्रिक मार्गदर्शनाला प्राधान्य देण्याची गरज केंद्रीय जलशक्‍तिमंत्री सी. आर. पाटील यांनी व्यक्त केली. गावाचे पाणी गावात आणि शेताचे पाणी शेतात अडविण्याच्या संकल्पनेतून जलसंधारणाची कामे राबविण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या घरात, तसेच शेतात पाणी अडविण्यासाठी छोटे जलसंधारण काम केल्यास भूजल पातळीत मोठी वाढ होऊ शकते. जलसंधारणाच्या कामात अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन अंमलबजावणीतील अडचणी दूर कराव्यात, असेही केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले.

‘जलजीवन मिशन’च्या कामांना गती देणार

‘जलजीवन मिशन’अंतर्गत निधी खर्चाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबरपर्यंत निधी विनियोगाचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात येतील. तसेच, योजनेची शाश्वतता राखण्यासाठी पाण्याचा खात्रीशीर स्रोत आणि वीज बिल भरणा या दोन महत्त्‍वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.