मुंबई : दहीहंडी उत्सवात दहा थर रचत एकमेकांना ठस्सन देणाऱ्या कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकांत आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डवरून शर्यत सुरू झाली आहे. कोकण नगर गोविंदा पथकाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले. याला जय जवानने आक्षेप घेतला आहे. आम्हीसुद्धा दहा थर रचले, तेही तीन वेळा. त्यामुळे आम्हालाही न्याय मिळायला हवा, असे जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी म्हटले आहे. त्यांना कोणत्या निकषाच्या आधारे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र मिळते? असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
कोकण नगर गोविंदा पथकाला प्रो-गोविंदा स्पर्धेचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावर संदीप ढवळे यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत.
कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला हे प्रमाणपत्र मिळणार असल्याचे आम्हाला बुधवारी (दि.3) रात्री समजले. त्यांना कोणत्या निकषाच्या आधारवर हे प्रमाणपत्र मिळते? हेच आम्ही बघत आहोत. दहीहंडी होऊन एक महिना झाला असून निकष काय होते हे आम्हाला अद्याप समजलेले नाहीत. आम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमुख यांना विचारले असता आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला उत्तर दिले जात नसून या गोष्टी न पटणाऱ्या आहेत. अशा वेळी पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. आम्हाला कुठेतरी पाणी मुरताना दिसत आहे, अशी शंका ढवळे यांनी यावेळी व्यक्त केली.
आम्ही दिवसभरात दहा थर तीन वेळा रचले. मात्र, याकडे कुणीही लक्ष दिले नाही. आम्ही ज्या ठिकाणी १० थर लावले, त्या ठिकाणाच्या आयोजकांना विनंती आहे की, त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे निखिल शुक्ला यांच्याशी संवाद साधावा आणि जय आणि याचा काहीही संबंध नाही. पण जवानने १० थर लावल्याची माहिती द्यावी. ठाकरे बंधूंच्या राजकारणाशी दुर्लक्ष करून आमचे खच्चीकरण केले जात आहे, अशी खंत ढवळे यांनी यावेळी व्यक्त केली.
दहीहंडी दिवशी (१६ ऑगस्ट) संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात कोकण नगर गोविंदा पथकाने दहा थर रचून विश्वविक्रम केला. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या याच दहीहंडी उत्सवात त्याच दिवशी जय जवान गोविंदा पथकानेही दहा थर रचले. विशेष म्हणजे जय जवान गोविंदा पथकाने त्याच दिवशी तीन वेळा ही कामगिरी साकारली. तरीही कोकण नगर गोविंदा पथकाने केलेल्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे आता नवा वाद रंगला आहे. यंदाच्या प्रो-गोविंदा लीगमध्येही मागील दोन हंगामाचा विजेता जय जवान गोविंदा पथकाला वगळण्यात आले होते.