

मुंबई : राज्यातील विद्यापीठे तसेच महाविद्यालयांत असलेल्या रिक्त प्राध्यापकांच्या संख्येबाबत चिंतेची बाब आहे. या रिक्त जागांवर महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये गुणवत्तेच्या आधारे शिक्षकांची निवड करण्यासाठी प्रवेश पूर्व परीक्षा अशा प्रकारची पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याबाबत आपण आग्रही असून, यासंदर्भातील उपाययोजना असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात मोठ्या थाटात साजरा झाला. यावेळी ते बोलत होते. कुलपती म्हणाले की, विद्यादान हे पवित्र कार्य आहे, महाविद्यालये व विद्यापीठ विभागांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्ग काढला पाहिजे, यासाठी राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापकांची निवड करताना एक सामायिक परीक्षादेखील घेतली जावी यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहेत.
राज्यातील सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचे शैक्षणिक वेळापत्रक तयार करावे. ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. जून महिन्यापर्यंत निकाल जाहीर करून एक महिन्यात दीक्षान्त समारंभ आयोजित करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना पदवी लगेचच मिळेल, असेही ते म्हणाले.