

मुंबई : खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आता मच्छीमारांना अत्याधुनिक सॅटेलाईट फोन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी मत्स्य Fishing Newsव्यवसाय विभाग आणि बीएसएनएल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून या योजनेचा शुभारंभ मंत्रालयात करण्यात आला. यावेळी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अधिकारी उपस्थित होते. या फोनद्वारे इनकमिंग आणि आउटगोइंग अशा दोन्ही प्रकारच्या संपर्काची सुविधा उपलब्ध आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ५ मच्छीमारांना सॅटेलाईट फोनचे वितरण करण्यात आले. राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
यावेळी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, राज्यातील मच्छीमारांचे प्राण आणि उपजीविका सुरक्षित ठेवणे, ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. खोल समुद्रात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत सॅटेलाईट फोन सुविधा मच्छीमारांसाठी जीवनदायी संपर्क व्यवस्था ठरेल.
दुर्गम भागातही सातत्यपूर्ण संपर्क
बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी ग्लोबल सॅटेलाईट फोन सर्व्हिस (GSPS) चे सादरीकरण करून समुद्रातील दुर्गम भागातही सातत्यपूर्ण संपर्क कसा राखता येईल, याची माहिती दिली. या तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातही संपर्क साधणे शक्य होणार असून खराब हवामान, यांत्रिक बिघाड, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा इतर संकटांच्या वेळी तत्काळ मदत मागविणे सुलभ होणार आहे.