

मुंबई : पुढील महिन्यात होणार्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात डान्स बार बंदी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मांडले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने डान्स बार बंदी कायद्यात काही सुधारणा सुचविल्या होत्या. त्यानुसार नव्या कायद्यात सुधारणा केल्या जाणार आहेत.
मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत डान्स बार बंदी कायद्यात सुधारणा करण्यावर चर्चा झाली. त्यानुसार सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकाने डान्स बारमध्ये काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. हे निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने सुचविल्यानुसार आणले जाणार आहेत. त्यानंतर डान्स बार आणि ऑर्केस्ट्राबारबाबत नवी नियमावली लागू होईल. डान्स बार फ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नकोत, बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान दोन मीटरचे अंतर असावे, ग्राहकांना डान्स फ्लोअरवर जाण्यास बंदी, बारबालांवर पैशांची उधळण करण्यास बंदी, धूम्रपान करण्यास मनाई, बारबालांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी नसावे. बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे सक्तीचे करावे तसेच गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था असावी, असे नियम लागू केले जाणार आहेत.