Government Hospital: सरकारी रुग्णालयांत उपचारसेवा झाली ‘हायटेक’

यामुळे तपासणी, उपचार तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक सक्षम होणार आहेत.
Government Hospital
Government HospitalPudhari
Published on
Updated on

मुंबई: सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आता अधिक आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय तसेच सेंट जॉर्ज रुग्णालयात विविध अत्याधुनिक सुविधांचे उद्‌घाटन करण्यात आले. यामुळे तपासणी, उपचार तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक सक्षम होणार आहेत.

शासकीय दंत महाविद्यालयातील मुखरोग निदान व क्ष-किरणशास्त्र विभागाचे नूतनीकरण करण्यात आले असून, येथे अत्याधुनिक सीबीसीटी (कोन बीम कॉम्प्युटेड टोमोग्राफी) यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

Government Hospital
Naresh Goyal Money Laundering Case: ५,७१६ कोटींच्या कथितगैरव्यवहारातून सुटकेसाठी नरेश गोयल न्यायालयात

कमी किरणोत्सर्गात दात आणि जबड्याची त्रिमितीय (३डी) तपासणी या यंत्रणेद्वारे करता येणार आहे. जबड्यावरील दुखापती, सिस्ट, गाठी, तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित बदल, डेंटल इम्प्लांट तसेच गुंतागुंतीच्या दंतशस्त्रक्रियांचे अचूक नियोजन यामुळे शक्य होणार आहे. यापूर्वी अशा तपासण्यांसाठी रुग्णांना खासगी केंद्रांवर जावे लागत होते.

प्रसूती सेवा पुन्हा सुरू

सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्रसूती व स्त्रीरोग विभागातील ५० खाटांच्या वॉर्डचे नूतनीकरण करण्यात आले आहे. कोविडनंतर बंद असलेली प्रसूती सेवा या नव्या वॉर्डच्या प्रारंभामुळे पुन्हा सुरू होणार आहे. महिलांना सुसज्ज उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

रुग्‍णांना मोठा दिलासा

सेंट जॉर्जमध्ये अत्याधुनिक हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी (एचबीओटी) केंद्र सुरू करण्यात आले आहे. गंभीर जखमा, संसर्ग तसेच काही विशिष्ट आजारांवरील उपचारांसाठी या केंद्राचा उपयोग होणार आहे. प्रगत उपचारपद्धती सरकारी रुग्णालयात उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गंभीर रुग्‍णांवर तातडीने उपचार शक्‍य

सेंट जॉर्ज रुग्णालयातील डायलिसिस सेवेचा विस्तार करून ती आता २४ तास उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मूत्रपिंडाच्या रुग्णांना रात्रीच्या वेळीही डायलिसिसची सुविधा मिळणार असून, प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या सहकार्याने उपलब्ध झालेल्या नव्या कार्डियाक रुग्णवाहिकेमुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या तसेच अन्य गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे शक्य होणार आहे.

१० कोटींचे ४८० आसनी सभागृह

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या ४८० आसनी अत्याधुनिक सभागृहाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सुमारे १० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या सभागृहात एलईडी स्क्रीन, वातानुकूलित यंत्रणा यांसह आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे सभागृहात पाणी शिरल्याने नियोजित उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.

चांगल्या सुविधांची आरोग्य मंत्र्यांची ग्वाही

आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण केल्यानंतर आता हे सभागृह विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहे. यासोबतच सेंट जॉर्ज रुग्णालयातील चार महत्त्वाच्या सुविधांचेही उद्घाटन करण्यात आले आहे. या संपूर्ण नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रुग्णांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news