गोवंडी : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर शिवाजीनगर सिग्नलजवळ शनिवारी दुपारी एका डंपरचालकाने दुचाकीवरून जाणार्या चार जणांना चिरडले. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांसह चौघांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करीत स्थानिक नागरिकांनी एक ते दीड तास रास्ता रोको करीत पोलिसांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला.
शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नूर मोहम्मद गलेन (42) हे त्यांचे तीन पुतणे आर्यन, मोहम्मद हुसेन, अब्दुल गनी यांना त्यांच्या दुचाकीवरून मानखुर्दहून घाटकोपरच्या दिशेने घेऊन चालले होते. यावेळी शिवाजीनगर येथे सिग्नल लागलेला असताना तिलक कुमार महातो (35) या डंपरचालकाने भरधाव वेगात त्यांना धडक दिली.
यातील नूर मोहम्मद आणि आर्यनला राजावाडी, तर मोहम्मद हुसेन आणि अब्दुल गनीला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी पोलिसांनी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेमुळे स्थानिक नागरिक मात्र संतप्त झाले. या मार्गावर वारंवार असे अपघात होत आहेत. नवा पूल बनविला पण त्याचे योग्य नियोजन नाही, सर्रास वाहतुकीचे नियम मोडले जातात, पण पोलीस कारवाई करीत नाहीत. यामुळे हे अपघात होत असल्याने याबाबत तात्काळ कारवाईची मागणी स्थानिकांनी केली. प्रक्षुब्ध जमावाने डंपरच्या काचा फोडल्या. तसेच सुमारे एक ते दीड तास रस्ता रोको केला. यामुळे या मार्गावर सुमारे तीन ते चार तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर सौम्य लाठीचार्ज केल्यानंतर जमाव पांगून रस्ता मोकळा झाला.