

मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांच स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या दंतचिकित्सक पत्नी डॉ. गौरी पालवे -गर्जे (वय 28) यांनी जीवन संपविल्याच्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे.
अनंत गर्जे यांच्यावर डॉ. गौरी यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप डॉ. गौरी यांच्या आई वडिलांनी केला होता. तसेच या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा, अशीही मागणी केली होती. एकूण या प्रकरणाचे गांभिर्य ओळखून गृहविभागाने एसआयटी नेमण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस उपायुक्त (झोन 4) आर. रागसुधा आर. यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेले हे विशेष पथक तपास करणार आहे. या पथकात एकूण आठ पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे. अनंत गर्जे यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली असून, पत्नी डॉ. गौरी पालवे (28) यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
वरळी, मध्य मुंबई येथील राहत्या घरी डॉ. गौरी यांनी घरगुती वादातून कथितरित्या गळफास लावून आत्महत्या केली होती. त्या पालिकेच्या केईएम रुग्णालयात कार्यरत होत्या. डॉ. गौरी यांच्या वडिलांनी वरळी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर अनंत गर्जे आणि त्यांच्या दोन नातेवाईकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉ. गौरी आणि अनंत गर्जे यांचा विवाह याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि गौरी पालवे यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीनुसार मुंबई पोलिसांकडून आता एसआयटी मार्फत सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.