गोरेगाव : आरे रॉयल पाम परिसरात पार्टी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक गुंडांची मारहाण; तिघांना अटक

गोरेगाव : आरे रॉयल पाम परिसरात पार्टी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक गुंडांची मारहाण; तिघांना अटक

जोगेश्वरी; पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव पूर्व येथील प्रसिद्ध आरे कॉलनीतील रॉयल पाम परिसरात एक गंभीर घटना घडली आहे. रॉयल पाम परिसरातील व्हीला मध्ये पार्टी साजरी करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर येत आहे. विद्यार्थ्यानी विरोध केला असता, स्थानिक गुंडांनी विद्यार्थ्यावर चॉपर आणि चाकूने हल्ला केला. या घटनेत विद्यार्थ्याना जबर दुखापत झाल्याचे कळताच गुंडांनी तेथून पळ काढला. हितेश देसाई असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून सध्या त्याच्यावर जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

आरे कॉलनीतील रॉयल पाम परिसरात बेकायदेशीर व्हिला (बंगला) बांधून विद्यार्थी आणि तरुणांना ड्रग्ज आणि दारू दिली जात आहे. सदर प्रकरण आरे कॉलनी रॉयल पाममधील व्हिला क्रमांक २४७ शी संबंधित आहे. सर्व विद्यार्थी गोरेगाव येथील रहिवाशी असून सर्व टी वाय बी कॉमचे विद्यार्थी आहेत.

मौजमजा करण्यासाठी तरुणांना येथील बंगले भाड्याने दिले जातात, विद्यार्थी दारूच्या नशेत असताना स्थानिक गुंड तेथे जाऊन विद्यार्थ्यांना लुटतात आणि विद्यार्थिनींची छेड काढतात. असाच प्रकार गोरेगाव येथे राहणाऱ्या सहा विद्यार्थ्यांसोबत घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी आरे कॉलनी येथील रॉयल पाममध्ये बांधलेल्या बंगल्यात (व्हिला) पार्टीसाठी गेले होते. त्याठिकाणी पार्टी सुरू असताना लूटमार आणि हल्ला झाला. प्रथम विद्यार्थ्यांना लुटण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले नाहीत तेव्हा त्यांनी चॉपर आणि चाकूने हल्ला केला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतरही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली. अखेर या प्रकरणात आरे पोलिसांनी बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करून ३ आरोपींना अटक करण्यात आली असून अरे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

रॉयल पाम परिसरातील बेकायदेशीर व्हिला बंद करावा, अशी मागणी नातेवाइकांकडून केली जात आहे. कारण इथे पार्टी करायला आलेल्या किती विद्यार्थ्यांचा जीव गेला कुणास ठाऊक आणि किती विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रकरण आजपर्यंत समोर आलेले नाही. त्यात पोलीस अधिकारी नरेंद्र शिंदे यांच्या मुलाच्या मृत्यूच्या प्रकरणाचाही समावेश आहे.

आमच्या इमारतीत राहणाऱ्या हितेश देसाई याच्यावर ३१ तारखेला आरे कॉलनी मध्ये प्राणघातक हल्ला झाला. तो अजूनही हॉस्पिटल मध्ये आहे. पोलिसांनी हवी तशी कारवाई केलेली नाही. स्थानिक गुंड अक्षय बचाटे, विकी बचाटे, अकबर, आणि मुख्य दाउद शेख ही त्या आरोपींची नावं आहेत, त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news