

नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा
सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंतचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोन्याचे दर दररोज नवीन उच्चांक गाठत आहेत. गेल्या दोन दिवसांतच सोने १० ग्रॅममागे दोन हजार रुपयांनी वाढले. गुरुवारी सोने ७९ हजार रुपये तोळे होते. मात्र, जीएसटी, घडणावळीसह एक तोळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ८७ हजार ३७० रुपये मोजावे लागले.
दिवाळीपर्यंत सोन्याचे दर ८० हजार रुपये, तर नवीन वर्षात जानेवारीत १ लाख रुपयांवर जाण्याची शक्यता इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीशी बोलताना दिली.
सोन्याचा चढ-उतार गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. मात्र सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या आजही तेवढीच असल्याचे कुमार जैन यांनी सांगितले. दिवाळीत सोन्याच्या दरात आणखी वाढ होणार असून तोळ्याचा भाव ८० हजार रुपये पार जाईल.
म्हणजे जीएसटी आणि घडणावळ धरून एक तोळे सोने ८८,४०० होण्याची शक्यता कुमार जैन यांनी वर्तवली आहे. मुंबईत यंदा २० लाख लग्नसोहळे होणार असल्याने सराफ बाजारात ६०० कोटींचे मोठी उलाढाल होईल, असे जैन म्हणाले.
नवीन वर्षात जानेवारीत सोने उच्चांक गाठणार असून १० ग्रॅम मागे १ लाख रुपये मोजावे लागतील, अशी शक्यता कुमार जैन यांनी वर्तवली. गुरुवारी मुंबईत ५० टन सोन्याची विक्री झाली. सराफ बाजारात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असल्याचे ते म्हणाले.