

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विरोधात जोरदार आवाज उठवल्यानंतर अखेर गिरणगावकरांना मुबलक पाणी मिळाले आहे. पण सध्या वाढवलेल्या पाण्याचा दाब कायम राहिला तरच, महापालिकेचे आभार मानले जातील. अन्यथा पाण्यासाठी आंदोलन सुरूच राहील असा इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे.
परळ, लालबाग, काळाचौकी आदी परिसरात गेल्या काही दिवसापासून पाण्याची मोठी टंचाई भासत होती. अनेकदा तक्रारी करूनही पाणीटंचाईचा प्रश्न सुटलेला नव्हता. अखेर येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेच्या परळ एफ दक्षिण विभाग कार्यालयावर धडक दिली.
एवढेच नाहीतर येथील अधिकाऱ्यांना घेरावही घातला. त्यामुळे महापालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणीटंचाईचा शोध घेण्यास सुरुवात केली. या भागातील बहुतांश जलवाहिन्या या जमिनीखालून जात असल्यामुळे काही जलवान्यांमधून पाण्याची गळती होत असल्याचे पालिकेला दिसून आले होते. त्यानुसार तातडीने खोदकाम करून नवीन जलवाहिन्या टाकल्या.