

पुढारी ऑनलाईन डेस्क :
कुर्लाची बेस्ट अपघात घटना ताजी असतानाच घाटकोपर मध्ये देखील एका टेंपो चालकाने भाजी मार्केट मध्ये गाडी घुसवून पाच जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट मध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत प्रीती रितेश पटेल (वय 35 वर्ष राहणार भागीरथी चाळ, पारशीवाडी, घाटकोपर पश्चिम मुंबई) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रेश्मा शेख, मारूफा शेख, तोफा शेख आणि मोहरम अली अब्दुल रहीम शेख (सर्व जण राहणार - चिराग नगर, पारशीवाडी, मच्छी मार्केट , घाटकोपर पश्चिम मुंबई) हे पादचारी जखमी झाले आहेत.
या प्रकरणी चालक उत्तम बबन खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिराग नगर मार्केट मध्ये शिरतानाच अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने बाजारात आलेल्या पाच जणांना चिरडले. स्थानिकांनी जखमींना राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी नेले. घटनास्थळी घाटकोपर पोलीस दाखल झाले आणि त्यांनी चालक आणि टेम्पो ला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा पर्यंत या बाबत पोलिसांचा तपास सुरू होता.