घाटकोपर : घाटकोपर पूर्व येथील टिळक मार्ग मुंबई मनपा शाळेत रोजी पुन्हा एकदा पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठा राडा केला. यावेळी त्यांनी नव्या इमारतीत स्वत:च शाळा भरवून महापालिका प्रशासनाला आव्हान दिले. यावर महापालिका कोणता निर्णय घेते याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
येथे सुरू असलेली पालिकेची शाळा येथून सुमारे दीड ते दोन किमी लांब असलेल्या दुसर्या पालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्याचा निर्णय अधिकार्यांनी घेतला आहे. मात्र या शाळेत मराठी आणि हिंदी माध्यमाचे सुमारे साडेतीनशे विद्यार्थी शिक्षण घेतात. आजूबाजूला असलेल्या झोपडपट्टीमधून कष्टकरी समाजातील ही मुले आहेत.
तीन वर्षांपूर्वी या शाळेचा मोठा भाग पाडून सहा महिन्यात येथे नवी इमारत उभी करून पुन्हा येथे शाळा सुरु करू, असे आश्वासन पालकांना देण्यात आले होते. तोपर्यंत या शाळेच्या एका बाजूला छोट्या एकमजली इमारतीत ही शाळा भरत होती. मात्र हा भाग अतिशय धोकादायक झाला होता. म्हणून काही दिवसांपूर्वी अचानक पालिकेच्या अधिकार्यांनी पालकांना ही शाळा बंद करून दुसरीकडे सुमारे दीड दोन किलोमीटर लांब असलेल्या दुसर्या शाळेत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र यास विद्यार्थी व पालकांनी जोरदार विरोध केला.
शाळेची नविन इमारत पूर्ण तयार झालेली असताना तसेच यातील दोन मजले पूर्णपणे तयार झालेले असताना शाळा याच नव्या इमारतीत सुरु करावी अथवा आम्ही स्वतः शाळेतील साहित्य या इमारतीत स्थलांतरित करू असा इशारा पालकांनी पालिकेला गुरवारी दिला होता. मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय ना घेता सोमवारी विद्यार्थ्यांना इथून दुसर्या शाळेत नेण्याचे आदेश दिल्याने पालक संतप्त झाले.त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी जुन्या शाळेतील बाक व इतर साहित्य स्वतः उचलून नव्या इमारतीत नेले. या वेळी शाळा आमच्या हक्काची अश्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
याबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी येथे पोहचले.यावर पालक आणि विद्यार्थ्यांनी आपण आता याच नव्या इमारतीत बसणार अथवा या साडे तीनशे विद्यार्थ्यांचे दाखले काढून घेणार असा पवित्रा घेतला. त्यामुळे आता पालिका प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.