

मुंबई: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई उपनगर-२ कार्यालयाने अवैध मद्यनिर्मितीविरोधात मोठी कारवाई करत बनावट स्कॉच मद्य तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत बनावट स्कॉच मद्य, रिकाम्या बाटल्या, विविध नामांकित ब्रँडची बनावट बुचे, बाटल्यांचे सिलबंद करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच चारचाकी वाहनासह एकूण १९ लाख ५१ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्कच्या एल विभागाला मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक शिवशंकर पाटील, दुय्यम निरीक्षक अनिल राठोड, वैशाली यादव तसेच जवान मोहन सोनवणे, पूजा राजन आणि सागर तडवी यांच्या पथकाने ७ जून रोजी घाटकोपर परिसरात सापळा रचला.
यावेळी चारचाकी वाहनातून विविध ब्रँडच्या बनावट स्कॉच मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर धारावी परिसरातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये बनावट स्कॉच मद्य, रिकाम्या बाटल्या, विविध ब्रँडची बनावट बुचे आणि सिलबंद करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत १९ लाख ५१ हजार १२० रुपये आहे.या प्रकरणात छगन अमृत चौहान, श्यामरतन बंकटी शिरसागर (ड्रायव्हर) आणि विनोद होसी परमार यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक अनिल राठोड करीत आहेत. दरम्यान, बनावट मद्याची निर्मिती अथवा विक्री होत असल्याची माहिती नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांक आणि टोलमुक्त क्रमांकावर द्यावी, असे आवाहन अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी केले आहे.