

Manoj Jarange Supporters Mumbai
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून निघालेल्या आंदोलकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज (दि.२) गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर बुधवारपासून (दि.३) मुंबईत राज्यातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणावर गावोगावी एकत्र येत आहेत. त्यांनी मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
गावोगावी मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने जमू लागले आहेत. विसर्जन झाल्यानंतर आंदोलकांचे लोंढे निघतील आणि मुंबईत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी धडकतील. यामध्ये महिला वर्गाचाही विशेषतः मोठा सहभाग अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
संपूर्ण राज्यभरातून गावच्या गाव आंदोलक मुंबईकडे निघणार असून बुधवारी मुंबईत प्रचंड जनसागर उसळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मराठा समाजाच्या या लढ्याला लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून आंदोलनाचा जोर आगामी दोन दिवसांत अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.