

मुंबई : गणेशोत्सवामध्ये मंडप बांधण्यासाठी खोदण्यात येणार्या प्रत्येक खड्ड्यासाठी तब्बल 15 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. गणेशोत्सव मंडळांनी बैठक घेऊन याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पूर्वीप्रमाणे 2 हजार दंड कायम ठेवण्यात आला आहे.
गणेशोत्सवासाठी मंडप घालताना मंडळांना भर रस्त्यात खड्डे खोदावे लागतात. त्यामुळे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे मोठे नुकसान होते.ते भरून काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यावर्षीपासून प्रतिखड्डा 15 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत गणेशोत्सव समन्वय समितीसह गणेशोत्सव मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा केली आणि दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करू नये, असे निर्देश दिले.
या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने 15 हजार रुपये दंडाचा निर्णय मागे घेत पूर्वीप्रमाणे दोन हजार रुपये दंड कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता जुन्या नियमानुसार प्रत्येक खड्ड्यासाठी केवळ दोन हजार रुपये शुल्क आकारले जाईल, असे जाहीर केले. निर्णयाबद्दल समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबईतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण होत आहे. हे रस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केले जात आहेत. त्यामुळे मंडळांनी रस्ते न खोदता मंडप उभारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहनदेखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.