

मुंबई : राजेश सावंत
माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्तीना कृत्रिम तलावात विसर्जनाची परवानगी देण्यात आली असली तरी, येणाऱ्या गणेशोत्सवात पीओपी मूर्तीला पूर्णपणे बंदी राहणार आहे. त्यामुळे अशा मूर्ती नैसर्गिक तलाव अथवा समुद्रातच नाही तर कृत्रिम तलावातही विसर्जन करता येणार नाही. याकडे दुर्लक्ष केल्यास पीओपी मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जबाबदार धरण्यात येईल. एवढेच नाही तर, हायकोर्टाच्या अवमान प्रकरणी दोघांवरही पोलीस कारवाई होऊ शकते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मुंबई हायकोर्टाने पीओपी गणेशमूर्तीना पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे अशा मूर्ती घडवू नये व त्यांची प्राणप्रतिष्ठापनाही करण्यात येऊ नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. माघी गणेशोत्सवापूर्वी म्हणजे ६ जानेवारी २०२५ मध्येही परिपत्रक काढून पीओपी मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये, असे निर्देश देण्यात आले होते. तरीही काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पीओपीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. हा हायकोर्टाचा अवमान आहे. तरीही महापालिकेने दोन पावले मागे टाकत, या मूर्तीना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी सुविधा उपलब्ध केली. पण अशा प्रकारची सुविधा यापुढे उपलब्ध करून दिली जाणार नसल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
पीओपीला सरसकट बंदी असल्यामुळे भाद्रपदामध्ये येणाऱ्या गणेशोत्सवात घरगुती मूर्तीच नाही तर, सार्वजनिक मूर्तीही पीओपीच्या घडवता येणार नाहीत. याचे पालन न करणाऱ्या मूर्तिकारांवर दंडात्मकच नाही तर फौजदारी कारवाई होऊ शकते. एवढेच नाही तर जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पीओपी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतील, त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे प्रदूषण मंडळ व हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करणे हे जसे मुंबई महापालिकेचे कर्तव्य आहे तसेच ते मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचेही असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
पर्यावरणपूरक मूर्तीला उंचीची मर्यादा राहणार नाही. लग्नपत्रिका, कागद, शाडूची माती, डिंक, पाणी यांचे मिश्रण करून फायबरच्या साच्यामध्ये टाकून मूर्तीला मूर्तिकार आकार देतात. विशेष म्हणजे ही मूर्ती कितीही फुटापर्यंत उंच बनवता येते. त्याहीपेक्षा मूर्तीचे समुद्रात विसर्जन केल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासात मूर्ती पाण्यात विरघळून जाते, असे अंधेरी पश्चिम येथील मूर्तिकार नरेश मेस्त्री यांनी सांगितले.
भाद्रपदामध्ये येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मुंबई शहर व उपनगरात ३० ते ३५ ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यात अंधेरी पश्चिम, सात बंगला येथील स्वप्नाक्षय गणेशोत्सव मंडळासह गिरगावचा राजा, कांदिवली व गोरेगाव येथील मंडळांचा समावेश असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.