मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या नियमित गाड्या गणेश चतुर्थीत अवघ्या एक ते दोन मिनिटांत हाउसफुल्ल झाल्या असून वेटिंग तिकीटही मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे गणपतीसाठी गावी जाणार्या चाकरमान्यांचे वांदे झाले आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्ष व रेल्वेच्यावतीने सोडण्यात येणार्या जादा गाड्यांचा आधार उरला आहे.
गणेश चतुर्थीला कोकणात जाणार्या मुंबईकरांची संख्या लाखोच्या घरात असते. गणपतीला रस्ते मार्गे कोकणात जाणे म्हणजे वेळ काढू असून अनेकदा रस्त्यांमध्ये तासनतास अडकून पडावे लागते. त्यात भाडेही दाम दुप्पट असते. त्यामुळे चाकरमानी रेल्वेने जाणे पसंत करतात. बुधवार 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्यामुळे अनेकजण शनिवार 23 जून ते मंगळवार 26 ऑगस्ट या कालावधीत कोकणात जाण्यासाठी निघणार आहे.
या दिवसाचे रेल्वेचे आरक्षण गेल्या चार दिवसापासून सुरू झाले. पण 26 ऑगस्टपर्यंत नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. यात कोकणकन्या एक्स्प्रेससह तुतारी, मांडवी, जनशताब्दी, दिवा सावंतवाडी पॅसेंजर व दक्षिणेत जाणार्या गाड्यांचा समावेश आहे.
या गाड्यांचे आगाऊ आरक्षण मिळावे, यासाठी चाकरमानी रात्रीपासूनच आरक्षण केंद्राबाहेर रांगेत उभे होते. काहींनी ऑनलाइन टिकिट काढण्याचा प्रयत्न केला. पण अवघ्या एक ते दोन मिनिटात गाड्या हाउसफुल झाल्या. एवढेच काही तर वेटिंग तिकीट देणे बंद करून, रिग्रेट करण्यात आले. त्यामुळे गणपतीला नियमित धावणार्या गाड्यांतून प्रवासाचा मार्ग बंद झाला. नियमित गाड्या हाउसफुल झाल्यामुळे आता गणपतीला राजकीय पक्ष व रेल्वे मार्फत सोडण्यात येणार्या ज्यादा गाड्यांकडे चाकरमान्यांचे लक्ष लागले आहे. या गाड्यांची घोषणा गणेश चतुर्थीच्या अगोदर 15 ते 20 दिवस होत असल्यामुळे चाकरमान्यांसमोर प्रतीक्षा करण्यापलीकडे दुसरा पर्याय उरला नाही.
कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणार्या गाड्यांचे आगाऊ आरक्षण करण्यासाठी काही चाकरमान्यांनी एजंटकडे माहिती दिली होती. त्यामुळे यातील काही चाकरमान्यांना आगाऊ आरक्षण मिळाले. पण त्यासाठी त्यांना दाम दुप्पट पैसे मोजावे लागले आहेत. आगाऊ आरक्षण मिळवण्यासाठी एजंटने कोकणकन्या एक्सप्रेसच्या थ्री टियर एसीसाठी 1 हजार 800 रुपये तर स्लीपरसाठी एक हजार रुपये भाडे आकारले आहे. हेच तिकीट स्लीपरसाठी 395 रुपये तर थ्री टियर एसीसाठी 1,040 रुपये आहे. त्यामुळे एजंट मालामाल झाले आहेत.
कोकणकन्या - रिग्रेट
तुतारी - रिग्रेट
मांडवी - रिग्रेट
जनशताब्दी - रिग्रेट
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर - रिग्रेट