FYJC quota admissions
pudhari photo

FYJC quota admissions : अकरावीला कोट्यांतर्गत 60 हजार प्रवेश

1 लाख 13 हजार 48 विद्यार्थ्यांनी केले होते अर्ज; 52 हजार 561 जागा रिकाम्या
Published on

मुंबई ः राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या कोट्यांतर्गत अकरावी प्रवेश प्रक्रियेचा टप्पा शनिवारी संध्याकाळी पूर्ण झाला असून तीन दिवसांच्या मुदतीत राज्यातील 60 हजार 487 विद्यार्थ्यांनी कोट्यांतर्गत प्रवेश घेतला. विशेष म्हणजे एकूण अर्ज करणार्‍यांची संख्या 1 लाख 13 हजार 48 असताना निम्या विद्यार्थ्यांनी अर्ज करुनही प्रवेश न घेतल्याने 52 हजार 561 जागा रिकाम्या राहिल्या आहेत.

संपूर्ण राज्यातून 2 लाख 25 हजार 514 कोट्यांतर्गत जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी कोट्यांतर्गत प्रवेश घेतले आहेत, त्यांची नावे पुढील कॅप फेर्‍यांमधून वगळली जाणार आहेत. तर उर्वरित विद्यार्थी पुढील फेर्‍यांसाठी पात्र राहणार आहेत.

राज्यात एकूण 9 हजार 435 कनिष्ठ महाविद्यालये/उच्च माध्यमिक शाळा आहेत. तर 21.23 लाख इतकी प्रवेश क्षमता असून, त्यापैकी 18.97 लाख जागा कॅप फेर्‍यांकरिता आणि 2.25 लाख जागा कोट्यांतर्गत राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी पहिल्या फेरीत कोट्यातील प्रवेश पूर्ण केले असून यापैकी निम्या जागा रिकाम्या राहिल्या आहेत. अकरावीच्या नोंदणी प्रक्रियेनंतर 12 जूनपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत ‘इन हाऊस कोटा’तून सर्वाधिक 26 हजार 521 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यानंतर अल्पसंख्यांक कोट्यातून 26 हजार 210 प्रवेश, तर व्यवस्थापन कोट्यातून केवळ 7 हजार 756 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

सुरुवातीच्या दिवशी संकेतस्थळावर गुणवत्ता यादी उशिरा प्रसिद्ध झाल्याने फक्त 9 हजार 087 विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकले होते. मात्र पुढील दोन दिवसांत 24 हजार 629 आणि 26 हजार 771 विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्ण केल्याची माहिती शिक्षण संचालनायाकडून देण्यात आली.

12 दिवसांची प्रतीक्षा...

  • अकरावी प्रवेशासाठीची कोट्यांतर्गत प्रक्रिया 14 जूनला संपल्यानंतरही विद्यार्थ्यांना वाटपाची यादी मिळण्यासाठी तब्बल 12 दिवस वाट बघावी लागणार आहे.

  • 17 जूनला गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय वाटपाची प्राथमिक प्रक्रिया केली जाणार असून, त्यानंतर विभागीय कॅप समित्यांकडून वाटपाची पडताळणी केली जाईल.

  • या संपूर्ण प्रक्रियेनंतर 26 जूनला प्रथम फेरीची यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरून जवळपास पंधरवड्याचा कालावधी पूर्ण वाट बघण्यात घालवावा लागणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news