मुंबई : इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून पहिल्या प्रवेश यादीत राज्यातील 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. यामध्ये कला शाखेच्या 1 लाख 49 हजार 791 विद्यार्थ्यांचा, वाणिज्य शाखेच्या 1 लाख 39 हजार 602 विद्यार्थ्यांचा तर विज्ञान शाखेच्या 3 लाख 42 हजार 801 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सोमवारपासून ते 7 जुलैपर्यंत प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.
दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला तरीही राज्यातील विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळाला नव्हता. यामुळे राज्यातील विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने राबवली जात असलेली ही अकरावी प्रवेश प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली जात होती. ढकलेल्या वेळापत्रकानुसार सोमवारी ही यादी जाहीर होणार होती. अखेर काम पूर्ण झाल्याने ही यादी शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली.
या यादीत सर्वाधिक पहिल्या पसंतीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून 4 लाख 57 हजार 841 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. दुसर्या पसंतीचे 77 हजार 099, तिसर्या पसंतीचे 36 हजार 901 मिळाले आहेत. तर अर्ज केलेल्या 10 लाख 66 हजार विद्यार्थ्यांच्यापैकी अजूनही तब्बल 4 लाख 33 हजार 811 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना दुसर्या फेरीची वाट पहावी लागणार आहे.
12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचे जाहीर केले असले तरी या यादीत 10 लाख 66 हजार 5 विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. यामध्ये सर्वाधिक 6 लाख 9 हजार 718 विद्यार्थ्यांचे अर्ज विज्ञान शाखेसाठी आले आहेत. तर कला शाखेसाठी 2 लाख 31 हजार 356 आणि वाणिज्य शाखेसाठी 2 लाख 24 हजार 931 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या अर्जांपैकी एकूण 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे.
विज्ञान शाखेतून 3 लाख 42 हजार 801, कला शाखेमध्ये 1 लाख 49 हजार 791, तर वाणिज्यमध्ये 1 लाख 39 हजार 602 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. अजूनही राज्यातील 4 लाख 33 हजार 811 विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. यामध्ये 2.66 लाख विद्यार्थी विज्ञान शाखेतील सर्वधिक आहेत. या विद्यार्थ्यांना अकरावीच्या पुढील फेर्यांत प्रवेशाची वाट पहावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दहा महाविद्यालयांची पसंतीक्रम निवडण्याची संधी होती. यामध्ये 4 लाख 57 हजार 841 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. 77 हजार 99 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या दुसरा पसंतीक्रमांचे महविद्यालय मिळाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिले महाविद्यालय मिळाले आहे. त्यांनी प्रवेश घेतला नाही, त्यांना दुसर्या फेरीतून तो बाहेर पडेल आणि त्याचा विचार आता थेट तिसर्या फेरीपासूनच केला जाणार आहे. ही तिसरी फेरी रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घ्यावा लागणार आहे.
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय 4,57,841 विद्यार्थ्यांना
सोमवारपासून महाविद्यालयात प्रवेश घ्यावे लागणार