

मुंबई : दहावीला 90 हून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्यामुळे अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत कनिष्ठ महाविद्यालयांचा कट ऑफ वाढला आहे. बहुतांश महाविद्यालयांनी कटऑफ मध्ये नव्वदी पार केली आहे.
गेल्या वर्षीच्या प्रवेशाची यंदा तुलना केल्यास सेंट झेवियर्स महाविद्यालयात विज्ञान शाखेचा कटऑफ 91.6 वरून 93 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर के.सी. महाविद्यालयात विज्ञानचा कटऑफ 87.6 वरून 89.6 टक्क्यांवर आणि जय हिंद महाविद्यालयात वाणिज्य शाखेचा कटऑफ 91.6 वरून 92.6 वर पोहोचला आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. मुंबई विभागातील अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत एकूण 1 लाख 39 हजार 943 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे. ठाणे जिल्ह्यात 64 हजार 887, पालघरमध्ये 15 हजार 093 तर रायगडमध्ये 13 हजार 837 विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश मिळाले आहेत. सर्वाधिक प्रवेश हे वाणिज्य शाखेत 69 हजार 107 विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. विज्ञान शाखेचे 54,234 आणि कला शाखेचे 16,602 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. मुंबईत 4 लाख 67 हजार 720 जागा आहेत. त्यापैकी या फेरीत 1 लाख 39 हजार 943 विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाले आहेत. यामुळे अजूनही हजारो जागा रिक्त आहेत.
पहिल्या यादीत 80 ते 90 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व महामुंबईत दिसून आले आहे. दहावीच्या निकालात यंदा 90 प्लस विद्यार्थ्यांची संख्या यंदा सुमारे पाच हजारांनी वाढल्याने अकरावीच्या प्रवेशाच्या पहिल्याच यादीवर याचा परिणाम दिसून आला आहे. मुंबई तसेच उपनगरातील नामवंत महाविद्यालयातील अकरावीचा यंदाचा प्रवेश अनेकांना कमी अधिक टक्केवारी मुळे खडतर झाल्याचे दिसून आले आहे. कमी टक्केवारी असलेल्यांना मात्र दुसरी यादीची वाट पहावी लागली आहे.
पहिल्या यादीत 85 ते 90 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यानाच बहुतांश नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळाले आहेत. 70 ते 80 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नामवंत महाविद्यालयांचा पसंतीक्रम दिल्याने वरच्या पसंतीक्रम यामुळे अनेकांना महाविद्यालय मिळालेले नसल्याचेही तक्रारी आहेत. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे लागणार आहेत. अन्यथा पुढील एका फेरीसाठी ते प्रतिबंधित असणार आहेत.
पहिल्या यादीत आयसीएसई आणि सीबीएसई मंडळाच्या गुणवंताची संख्या अधिक असल्याचेही काही महाविद्यालयांकडून सांगण्यात आले. दहावीला 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच फेरीत नामवंत महाविद्यालयांमध्ये स्थान मिळवण्यासाठी मोठी धडपड केली आहे. परिणामी, कटऑफ नव्वदीच्या पुढे गेला असल्याचे महाविद्यायांकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगीनमध्ये जावून आपणास कोणते कनिष्ठ महाविद्यालय लॉट झाले आहे हे तपासून घेता येणार आहे. विद्यार्थ्यांस पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय लॉट झाले असल्यास सोमवारपासून प्रवेश घ्यावा लागणार आहे.
यंदाच्या अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील कटऑफ टक्केवारीत गेल्या वर्षाच्या तुलनेत स्पष्ट वाढ दिसून येते. झेवियर्स महाविद्यालयात विज्ञान शाखेचा कटऑफ 91.6 वरून 93 टक्क्यांवर, के.सी. महाविद्यालयात विज्ञानचा कटऑफ 87.6 वरून 89.6 टक्क्यांवर गेला.