मुंबई ः दहावी परीक्षा झाल्यापासून गेले तीन महिने विद्यार्थी घरी बसून आहेत. अकरावीच्या प्रवेशाची प्रतीक्षा करणार्या लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आता पहिल्या यादीसाठी 30 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रवेशाला उशिर होत असल्याने पालक आक्रमक झाले आहेत.
शालेय शिक्षण विभागाने यंदा दहावीच्या शालांत परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत 15 दिवस आधी म्हणजे 11 फेब्रुवारीपासून घेण्याचा निर्णय जानेवारी महिन्यात घेतला. तसेच या विद्यार्थ्यांची परीक्षा 17 मार्च रोजी संपली होती. शिक्षकांवर दबाव टाकत निकाल लवकर लावण्यासाठी पेपर तपासणीही झटपट करण्यात आली. त्यानंतर 13 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होऊन महाविद्यालये जुलैच्या पहिल्या आठवड्यात तरी सुरू होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र अजूनही केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून कोट्याचे प्रवेश व्यतिरिक्त अद्याप प्रवेश सुरु झालेले नाहीत.
राज्यभरात केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्या चांगलाच अंगलट आला आहे. या प्रक्रियेत सातत्याने ‘तांत्रिक अडचणी’ आल्याने आता पहिली यादी जाहीर करण्याची तारीख 30 जूनपर्यंत पुढे गेली आहे. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. माहितीचा अभाव, तांत्रिक अडचणी, आणि सततची अनिश्चितता यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 30 जून रोजी तरी यादी जाहीर होणार आहे का असा संतप्त सवालही पालकांकडून उपस्थित होत आहे.
26 जून रोजी पहिली यादी जाहीर होईल, या आशेने विद्यार्थी आणि पालकांनी संकेतस्थळावर वेळ घालवला. मात्र, तेथे ‘एरर’शिवाय काहीही दिसले नाही. रात्री उशिरापर्यंत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून कोणताही स्पष्ट खुलासा करण्यात आला नाही. परिणामी, पालक आणि विद्यार्थी संभ्रमावस्थेत राहिले.