Goat Meat Price Rise: मुंबईत बकऱ्यांची आवक घटली; ईदला मटण महागण्याची शक्यता

इंधन दरवाढीचा परिणाम; देवनार पशुवधगृहात 1 लाख 24 हजार 680 बकऱ्यांची नोंद
Goat Meat Price Rise
Goat Meat Price RisePudhari
Published on
Updated on

गणेश शिंदे

मुंबई: इंधन तेलाचे दर वाढल्याने वाहतूक खर्च महागला आहे आणि जागतिक आर्थिक मंदीमुळे सर्वच क्षेत्राला कमी-अधिक प्रमाणात फटका बसत आहे. इंधन तेल दरवाढ व आर्थिक मंदीचा परिणाम मुंबईतील बकरी व्यवसायावर होत आहे. त्यामुळे ऐन बकरी ईद सणाच्या काळात बकरीच्या मटणाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

बकरी ईदला चार दिवस राहिले आहेत. मुस्लिम बांधव या सणाला बकऱ्याची कुर्बानी देतात अशी प्रथा आहे. यासाठी अनेक मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून बकरी खरेदी करतात.

Goat Meat Price Rise
Bus fire Sion Panvel: सायन-पनवेल मार्गावर बर्निंग बसचा थरार; चालकाच्या प्रसंगावधानामुळे 22 प्रवासी बचावले

मुंबई महापालिकेच्या देवनार पशुवधगृहात बकरी ईद सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात पासधारक बकऱ्यांची आवक होते. मात्र, यंदा ही संख्या आवक 50 हजाराने घटली असून या पशुवधगृहात रविवार (दि.24) पर्यंत 1 लाख 24 हजार 680 बकऱ्यांची आरोग्य तपासणी प्रक्रिया झाली. त्यांना प्रशासन वीज, पाणी अशा सुविधा पुरवते.

पासधारकाला एका बकऱ्यामागे 218 रुपये प्रवेश शुल्क भरावे लागतात. तपासणी नंतर ते बकरे नेण्यासाठी हमाल व दलाल यांना प्रत्येकी 100 रुपये असे 200 रुपये त्याला द्यावे लागतात. 218 व 200 रुपये असे एकूण 418 रुपये खर्च व्यापाराला येतो.

या ठिकाणाहून मुंबईसह महानगर प्रदेशांमध्ये बकऱ्याची घाऊक खरेदी विक्री होते. इतर दिवशी पशूवध गृहात सरासरी 20 हजार ते 30 हजार आवक असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत पशुवध गृहातील अधिकारी म्हणाले, सर्व व्यापाऱ्यांना क्यूआरकोड प्रणालीद्वारे पास दिले जातात. राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश यासह महाराष्ट्रातील काही भागातून बकऱ्यांची आवक या पशुवधगृहात होते.

Goat Meat Price Rise
Navi Mumbai Police Raid: ड्रग्ज माफियांविरोधात 16 ठिकाणी धाडी; 25 आफ्रिकी ताब्यात

बकरी ईदला सर्वाधिक बकऱ्यांची आवक होते. या पशूवध गृहाची सुमारे 1 लाख 10 हजार 740 चौरस मीटर जागा आहे. याठिकाणी बकरीची दैनदिन आवक असतेच. पण, सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात आवक होते. यासाठी प्रशासनाने याठिकाणी मंडप उभाकेला आहे.

दरवर्षी बकरी ईद सणाच्या काळात 1 लाख 77 हजार बकऱ्यांची आवक होते. मात्र, यंदा ही आवक 50 हजारांनी घटली असल्याचे दिसून येत आहे. ईदसाठी 15 मे पासून 2026 बकऱ्यांची आवक सुरू झाली असून पशुवधगृहात 24 मे रोजी पर्यंत एकूण 1 लाख 24 हजार 680 बकऱ्यांची नोंद होती. त्यापैकी 50948 बकऱ्यांची आरोग्य तपासणी झाली. अजूनही 73732 बकरी पशुवध गृहात शिल्लक आहेत. 30 मे पर्यंत ईदसाठी बकरी नेतात.

दरम्यान, बाजारात 20 वीस किलोपासून ते 60 किलोपर्यंत बकऱ्या आहेत. 25 हजार रुपयांपासून ते 80 हजारपर्यंत त्यांचे दर आहेत. देवनारबरोबर, जोगेश्वरी, मीरा रोड येथेही बकऱ्यांची आवक होते. परंतु, हे प्रमाण फार कमी आहे असे सांगण्यात आले.

दृष्टिक्षेपात बकऱ्यांचे दर

  • 20 किलो - 25 हजार रुपये

  • 25 किलो - 30 हजार रुपये

  • 40 किलो - 45 हजार रुपये

  • 45 किलो - 50 हजार रुपये

  • 60 किलो - 80 हजार रुपये

वाढती महागाई, वाहतूक खर्चात वाढ आणि बकऱ्यांची आवक घटल्याने मुंबईत मटणाचा दर हा 900 रुपये किलोवर पोहोचला आहे. अजमेर, इंदौर, जयपुर, अहमदाबादसह महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, पंढरपूर, सांगोला, आटपाडी या भागांमधून बकऱ्यांची आवक याठिकाणी होते.

- इम्रान हामिद, मटण विक्रेते गोवंडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news