मुंबई : भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी गणेश चतुर्थीसाठी कोकणात जाण्यासाठी विशेष मोफत एसटी बसची सेवा जाहीर केली आहे. त्यामुळे जायचे कसे, हा प्रश्न सुटला आहे. मात्र, परतीच्या प्रवासाचे काय, असा प्रश्न लाखो चाकरमान्यांना पडला आहे. एसटी महामंडळाने परतीच्या प्रवासासाठी जादा बस सोडण्याची मागणी होत आहे.
मुंबई महानगरपालिकेसह ठाणे, नवी मुंबई व अन्य महानगरपालिकेमध्ये यंदा सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. चाकरमान्यांना खूष करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी गणेश चतुर्थीच्या काळात मोफत एसटी बस सोडल्या आहेत. रेल्वेचे आगाऊ आरक्षण न मिळालेल्या चाकरमान्यांना अगदी मोफत आपल्या गावी जाता येणार आहे. एवढेच काय तर शिवसेना आमदार निलेश राणे त्यांनी शिवसेना एक्सप्रेसची घोषणा केली आहे.
येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेही मोदी एक्सप्रेसची घोषणा करतील. त्यामुळे चाकरमान्यांचे रेल्वेने जाण्याचे स्वप्नही पूर्ण होणार आहे. पण हा मोफत प्रवास केवळ कोकणात जाण्यासाठी आहे. मात्र, चाकरमान्यांना मुंबईत परत कसे यायचे, असा प्रश्न पडला आहे. परतीच्या प्रवासासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने ना मोफत एसटी ना रेल्वेची सेवा जाहीर केली आहे. त्यामुळे स्वखर्चाने चाकरमान्यांना मुंबईत परतावे लागणार आहे.
आम्हाला परतीच्या प्रवासासाठी मोफत बस , रेल्वे नको पण मुंबईला जाण्यासाठी पुरेसा जादा बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वैभववाडी तालुका रेल्वे प्रवासी मित्र या संघटनेचे सदस्य दीपक मानकर व मोहन रावराणे यांनी केला आहे. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किमान साडेतीन ते चार लाख चाकरमान येणार आहेत. यातील अनेक चाकरमानी आपल्या कुटुंबासोबत मोफत बस व ट्रेनने येणार आहे. यांच्याकडे परतीच्या प्रवासासाठी कोणतीही वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने परतीच्या प्रवासासाठी जादा बस सोडाव्यात, अशी मागणी कोकणवासीयांनी केली आहे.
तालुका पातळीवर विशेष बस चालवाव्यात
गणेश चतुर्थीला लाखोच्या संख्येने चाकरमानी कोकणात येणार असल्यामुळे वाहनांचा मोठा तुटवडा भासणार आहे. त्यात रिक्षावाल्यांकडून चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे. त्यामुळे या काळात प्रत्येक तालुका पातळीवर विशेष बस चालवण्यात याव्यात, जेणेकरून मुख्य मार्केट येथून त्यांना या-जा करता येईल, अशी मागणीही चाकरमान्यांनी केली आहे.