

मुंबई: सोशल मीडियावर 'फ्री' चित्रपट डाउनलोड करण्यासाठी आलेल्या एका लिंकवर क्लिक करणे विक्रोळीतील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. या लिंकच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये घुसखोरी करून ३६.६६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळीतील फिर्यादीला सोशल मीडियावर चित्रपट मोफत डाउनलोड करण्याची आकर्षक लिंक दिसली. त्याने त्या लिंकवर क्लिक करून संबंधित फाइल डाउनलोड केली.
त्यानंतर त्याच्या मोबाईलमधील संवेदनशील माहिती आणि बँक खात्याशी संबंधित तपशील सायबर भामट्यांच्या हाती गेल्याचा संशय आहे. काही वेळातच त्याच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने ३६.६६ लाखांची रक्कम वळती करण्यात आली.
खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे संदेश आल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर पीडिताने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.