

मुंबई : दुसर्या व्यक्तीच्या क्रेडिट कार्डवरुन पेमेंट करुन एका हॉटेलची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी प्रतिक शैलेश भायानी या आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. त्यानेच अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
यातील तक्रारदार रायगडचे रहिवाशी असून सध्या ना. म जोशी मार्ग परिसरात राहतात. मालाडच्या एका हॉटेलमध्ये ते काम करतात. 18 ऑगस्टला त्यांच्या हॉटेलमध्ये प्रतिक हा गेस्ट म्हणून राहण्यासाठी आला होता. सहा दिवसांचे लॉजिंग व बोर्डिंगचे एकूण बिल 95 हजार 476 रुपये झाले होते. ते पेमेंट त्याने त्याच्या क्रेडिट कार्डवरुन केले होते. ते क्रेडिट कार्ड दुसर्या व्यक्तीचे होते. दुसर्या व्यक्तीच्या क्रेडिट कार्डची माहिती देऊन त्याने हॉटेलसह संबंधित क्रेडिट कार्डधारकाची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली होती.
याबाबत संबंधित क्रेडिट कार्डधारकाकडून तक्रार प्राप्त होताच हॉटेलच्या बँक खात्यातून ही रक्कम कपात करण्यात आली होती. हा प्रकार उघडकीस येताच हॉटेलच्या वतीने तक्रारदारांनी बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती.