Mumbai News | वाढवण बंदराजवळ वसवणार चौथी मुंबई !

आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुलेट ट्रेन, द्रुतगती मार्ग उभारणार, एमएसआरडीसीचा पुढाकार
Mumbai News
वाढवण बंदराजवळ वसवणार चौथी मुंबई ! file photo
Published on
Updated on

पालघर/मुंबई : देशातील सर्वांत मोठ्या वाढवण बंदराजवळ पालघरमध्ये चौथी मुंबई आकारास येणार आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, मुंबई-पालघर सागरी मार्ग आणि बुलेट ट्रेनसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यामुळे चौथी मुंबई ही सुपर कनेक्टिव्हिटी असलेले शहर ठरणार आहे.

भविष्यातील नियोजन

वाढवण बंदराच्या प्रभाव क्षेत्रातील १०७ गावांमध्ये आणि ५१२ चौ. किमी प्रदेशात चौथी मुंबई विकसित करण्याचा प्रस्ताव जानेवारी महिन्यात एमएसआरडीसीने राज्य सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावानुसार, चौथ्या मुंबईची हद्द वाढवण बंदराच्या परिसरापासून तलासरीपर्यंत विस्तारलेली असेल. प्रस्तावित क्षेत्र नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीला नियुक्त करण्यासाठी राज्य सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. एकदा ही मान्यता मिळाल्यास, एका वर्षाच्या आत संपूर्ण विकास आराखडा तयार केला जाईल.

विकास आराखड्याचे स्वरूप

एमएसआरडीसीने ३३.८८ चौ. किमी क्षेत्रासाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या अंतर्गत, जमीन वापर नकाशा, अधिसूचित क्षेत्राचे सर्वेक्षण आणि विविध तांत्रिक अभ्यास करण्यात येणार आहेत. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविल्या जातील. वाढवण बंदराच्या महत्त्वामुळे येथे रस्ते आणि वाहतूक व्यवस्थापन कंटेनर डेपो, लॉजिस्टिक पार्क आणि विविध पूरक उद्योगांचा विकास करण्यात येईल.

११ गावांतील विकास केंद्राला मंजुरी

वाढवण बंदरासोबतच या भागात चौथी मुंबई वसवण्याचे नियोजन सरकारकडून करण्यात आले आहे. यासाठी वंधवन, आंबीस्तेवाडी, वसगाव, वरोर, ताडियाले, धुमकेत, गुंगावडा, पोखरण, बहाडा-पोखरण, चांदेगाव आणि धाकटी डहाणू या ११ गावांमधील ३३.८८ चौ. किमी क्षेत्रावर विकास केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या विकास केंद्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

चौथ्या मुंबईची वैशिष्ट्‌ये काय ?

वाढवण बंदर हे जागतिक स्तरावर दहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे बंदर असेल, ज्यामुळे या भागाचा विकास झपाट्याने होईल. याच पार्श्वभूमीवर, सरकारने वाढवण विकास केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. चौथ्या मुंबईच्या विकासासाठी वर्सोवा-विरार-पालघर सी-लिंक हा प्रकल्पदेखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या सागरी मार्गामुळे नरिमन पॉईंट ते पालघर हा प्रवास केवळ एका तासात पूर्ण करता येईल. बंदरामुळे निर्माण होणाऱ्या व्यापार आणि उद्योग संधींचा विचार करता, येथे लॉजिस्टिक पार्क, पंचतारांकित हॉटेल्स, मनोरंजन केंद्र, गोल्फ कोर्स आणि कन्व्हेन्शन सेंटर्स उभारण्याची योजना आहे. तसेच, वाढवण बंदर ते दिल्ली-मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे मार्ग नियोजित आहे. शहराच्या हवाई दळणवळणाच्या सुविधांसाठी हेलिपॅड आणि एअरस्ट्रिप उभारण्याचेही नियोजन आहे.

नियोजन आणि मंजुरीची प्रक्रिया

चौथी मुंबई वसविण्यासाठी १०७ गावांतील ५१२ चौ. किमी क्षेत्र नियोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हे क्षेत्र नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर होताच एमएसआरडीसी चौथी मुंबई उभारण्याच्या दिशेने पुढील कार्यवाही सुरू करणार आहे. नीती आयोगाने मुंबई महानगराला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, आणि त्यासाठी आर्थिक विकास केंद्र (ग्रोथ हब) उभारण्याची योजना आखली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news