

नवी मुंबई: पुढारी वृत्तसेवा
नवी मुंबईतील जेष्ठ काँग्रेसचे नेते आणि नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून ते उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उद्या शनिवारी ऐरोलीत एका कार्यक्रमात दोन माजी नगरसेवकांसह पक्षप्रवेश करणार आहेत. गेले ३० वर्षांहुन अधिक काळ ते काँग्रेसमध्ये विविध पदावर कार्यरत होते.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खंद्दे समर्थक अशी त्यांची ओळख होती. काँग्रेसचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपचे नेते अशोक चव्हाण यांची त्यांनी भेट घेतली. म्हात्रे हे महापौर पदावर राहीले असून ऐरोली मतदारसंघात त्यांचा चांगला संर्पक असल्याने त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करावा असे सांगण्यात आले होते.
तशी त्यांची राजकीय भेट अशोक चव्हाण यांच्या मध्यस्थीने भाजप नेत्यांशी झाली होती. मात्र मंत्री गणेश नाईक भाजपात असल्याने मी भाजपात नको, अशी भूमिका म्हात्रे यांनी घेतल्याची चर्चा आहे. राजकीय मतभेद आहेत. त्यामुळे आमचं ठरलं असून माजी उप महापौर मंदाकिनी म्हात्रे, माजी नगरसेवक अंकुश सोनावणे, अनिकेत म्हात्रे हे रमाकंत म्हात्रे यांच्यासह उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या शनिवारी ऐरोलीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करणार आहेत.