मुंबई, पुढारी वृत्तसेवा : बोरिवली विधानसभा मतदार संघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अखेर उमेदवारी मागे घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी आज (दि.४) सकाळी फोन वर चर्चा करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. येणाऱ्या काळात राजकीय पुनर्वसन करू, असे आश्वासन फडणवीस यांच्याकडून मिळाल्याने शेट्टी यांनी ही माघार घेतल्याची माहिती भाजपा सूत्रांनी दिली.
भाजपामधून बंडखोरी करून गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून त्यांचे भाजपा उमेदवार संजय उपाध्याय यांना तगडे आव्हान निर्माण झाले होते. मात्र आता शेट्टीनी माघार घेतल्याने संजय उपाध्याय यांचा मार्ग मोकळा झाला आहे. बोरिवली विधानसभा मतदार संघात उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करून विलेपार्ले येथील रहिवासी असलेले तथा देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. यामुळे गोपाळ शेट्टी यांनी नाराजी व्यक्त करून अपक्ष लढण्याचे ठरविले होते, त्यांनी २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जही दाखल केला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर शेट्टी यांची समजूत काढली होती. परंतु शेट्टी यांनी अपक्ष लढण्यास ठाम होते, यापुढे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडेही त्यांना भेटले, परंतु शेट्टी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते, आपण लढाणार असल्याचे त्यांनी तावडे यांनाही सांगितले. मात्र आज ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारिख असल्याने शेट्टी यांनी पुढील राजकिय भविष्याचा विचार करून सकाळी १० वाजता आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले.
माजी खासदार गोपाळ शेट्टी हे सन २००४ आणि २००९ असे सलग दोन वेळा बोरिवली विधानसभा मतदार संघाचे आमदार राहिलेले आहेत. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचेसुध्दा दोन वेळा खासदार होते. यामुळे त्यांचा बोरिवली विधानसभा मतदार संघावर असलेली पकड आणि दांडगा जनसंपर्क ही यांची जमेची बाजू भाजपा उमेदवार संजय उपाध्याय यांना ती डोकेदुखी ठरू असती.