मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणी आणखी पाच आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. नितीन सप्रे, संभाजी पारबी, राम कनोजिया, प्रदीप तोंबर आणि चेतन पारधी अशी त्यांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता या सर्वांना 25 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, यासंदर्भात बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आमदार झिशान सिद्दीकी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणी सखोल पोलिस तपास करण्याची आणि न्याय मिळवून देण्याची विनंती केली. त्यामुळे सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे. कर्जत, अंबरनाथ आणि डोंबिवली येथे गुन्हे शाखेने कारवाई करून या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या.
शूटरला शस्त्रांसह आर्थिक मदत करणे आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे आदी जबाबदारी या पाच जणांवर सोपविण्यात आली होती. तसेच हे सर्व आरोपी लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात होते, असेही तपासातून समोर आले आहे.