

नवी मुंबई : मुंबई तसेच गुजरातच्या निर्यातदार कंपन्यांनी उरणच्या कारंजा मच्छिमारी बंदर येथील मच्छिमार तसेच व्यापार्यांना सुमारे 1 कोटींचा गंडा घातल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी एका मासे व्यापार्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून 7 जणांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नवापाडा कारंजा येथील अमृत वसंत कोळी (वय 36) या मासे व्यापार्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते स्थानिक मच्छिमारांकडून मासे घेवून त्यांचा निर्यातदार कंपन्यांना पुरवठा करतात. दोन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात माशांची ऑर्डर दिली होती. मात्र माशांची डिलीवरी करुनही ठरलेले पैसे या कंपन्यांनी दिले नाहीत.
पहिल्या गुन्ह्यात मुंबई येथील कंपनीचा समावेश असून या कंपनीच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघेजण गुजरातच्या वेरावळ येथील आहेत तर दोघे मुंबईचे आहेत. 18 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीत मालाचे पैसे, कमिशन,बर्फ व लोडींग चार्जेस यापोटी 74 लाखांचा व्यवहार करून मासे उचलले. मालाची डिलीवरी मिळाल्यानंतर पैसे न देताच सदर कंपन्यांचे प्रतिनिधी गायब झाले, असे काळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दुसर्या गुन्ह्यात गुजरातच्या कंपनीचा समावेश असून यातील दोन व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीत कारंजा पोर्ट येथून उधारीवर 27 लाखांचे मासे खरेदी करून नंतर माशांचे पैसे व कमिशन देण्यास नकार दिला. दोन्ही गुन्ह्यांतील कार्यपध्दती समान असून आम्ही गुजरात व महाराष्ट्र या राज्यांदरम्यान कार्यरत रॅकेटचा भाग आहेत का, याचा आम्ही शोध घेत आहोत.याशिवाय गंडा घातलेले पैसे परत मिळवण्यासाठीही आम्ही प्रयत्नशिल आहोत, असेही संबंधित पोलीस अधिकार्याने सांगितले.
आणखी काही तक्रारदार पुढे येणार
आरोपांची पडताळणी करण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी कारंजा बंदराला आम्ही भेट दिली असून यासंदर्भात आणखी काही तक्रारदार पुढे येण्याचा अंदाज आहे. हे केवळ हिमनगाचे टोक असू शकते, असेही त्या अधिकार्याने नमूद केले. मासे निर्यातीच्या व्यापारातील आर्थिक फसवणुकीचा हा एक पध्दतशीर प्रकार असल्याचा आम्हाला संशय आहे. यात स्थानिक व्यापार्यांना मोठे नुकसान सोसावे लागत असतानाच आरोपी मात्र राज्याच्या सीमा ओलांडून गायब होतात. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नाही, असेही सदर पोलीस अधिकार्याने सांगितले.