

मुंबई : निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 1 ऑक्टोबर 2006 नंतर 1 ऑक्टोबर 2007 पर्यंत जन्मलेल्या व 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवक युवतींना मतदार म्हणून नाव नोंदवता येत नाही. त्यामुळे या वर्षभराच्या कालावधीत जन्माला आलेल्या सुमारे पावणेदोन लाखापेक्षा जास्त युवक युवतींना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2006 पर्यंत 18 वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबर 2007 पूर्वी जन्मलेल्या व ऑक्टोबर 2025 पर्यंत 18 वर्षे पूर्ण झालेल्या नव मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अनेकांनी मतदार यादीत नाव जोडण्यासाठी प्रयत्न केले. परंतु वेबसाईट परवानगी देत नाही. याबाबतची तक्रार माहीम येथील सामाजिक कार्यकर्त्या रूपिका अनिल सिंग यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे नोंदवली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 12 जुलै 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये 18 वर्षे पूर्ण करणार्यांची नावे वर्षभरात चार वेळा 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर जोडण्याचे निर्देश होते. परंतु आयोग आपल्या स्वतःच्या नियमांची अंमलबजावणी करताना दिसून येत नाही. मागील एका वर्षापासून फक्त 1 ऑक्टोबर 2006 पूर्वी जन्मलेल्या 18 वर्षांचे युवक व युवतींचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून 1 ऑक्टोबर 2007 पर्यंत जन्मलेले युवक युती आपले मतदार यादीत नाव नोंदवू शकलेले नाहीत.
ऑक्टोबर 2007 पर्यंत 1,78,402 मुले जन्मली
मुंबई शहर व उपनगरात जन्म नोंदणी नुसार ऑक्टोबर 2006 ते ऑक्टोबर 2007 पर्यंत 1,78,402 मुले जन्मली आहेत. आयोगाने वेळोवेळी वेबसाइट आणि प्रत्यक्ष पद्धतीने नाव जोडण्याची परवानगी दिली असती, तर मुंबईत मतदारांची संख्या वाढली असती.