Farmer Loan Waiver | ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत रक्कम ‘डीबीटी’द्वारे हस्तांतरित
Farmer Loan Waiver |
Farmer Loan Waiver | ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी राज्यभरातील ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार २९ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. कर्जमाफी योजनेसाठी लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम वेगात सुरू असून, महिनाभरात ८० टक्के शेतकर्‍यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘सह्याद्री’ अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’चा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह मंत्री, अधिकारी उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी योजनेतील पहिल्या हप्‍त्‍याचे वितरण करण्यात आल्याची माहिती दिली.

आतापर्यंत आधार प्रमाणीकरण झालेल्या ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार २९ कोटींचे वितरण करण्यात आले आहे. जसजशी खाती प्रमाणित होतील तसतशी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल व खाते नील होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. साधारणपणे महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

१२ लाख खात्यांत तांत्रिक चुका

दरम्यान, अद्याप १८ ते १९ लाख खात्यांची प्रक्रिया सुरू आहे. तर, जवळपास १२ लाख खात्यांच्या आधार क्रमांकासह अन्य तांत्रिक चुका असून, ती यादी बँकांना परत पाठवली आहे. आठवडाभरात या चुकाही दुरुस्त होतील आणि आधार प्रमाणीकरणानंतर या खात्यातही कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे.

दोन टप्प्यांत कर्जमाफी योजना अंमलात आणली जाणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. साधारणत: महिनाभरात पहिल्या टप्प्यातील ८० टक्के खात्यात ही रक्कम जमा होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news