

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरातील एका इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजता आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सॅलेट २७ मधील दोन एकसारख्या दिसणाऱ्या इमारतींपैकी एका निवासी इमारतीत सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून घटनास्थळी आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इमारतीतून आग, धुराचे लोट दिसून येत आहेत. बेस्ट, पोलिस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि इतर एजन्सींसह विविध आपत्कालीन प्रतिसाद पथके तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत.