मुंबई : राज्यातील बी.फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र) अभ्यासक्रमांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) कित्येक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी तब्बल 54 हजार 921 विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर झाली असून 25 ते 27 सप्टेंबर या काळात या विद्यार्थ्याना प्रवेशासाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत. यानंतर 29 सप्टेंबर रोजी पहिली प्रवेश यादी जाहीर होणार असून संपूर्ण प्रवेश प्रक्रिया 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यानंतर शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे.
राज्यातील फार्मसी संस्थांना दरवर्षी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) कडून मान्यता घेणे बंधनकारक असते. यामुळे दरवर्षी काही प्रमाणात विलंब होतो. मात्र यंदा वारंवार प्रवेशाची मुदत वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. यंदाही तब्बल दोन ते तीन महिने प्रवेश वेळापत्रक लांबणीवर गेल्याने शैक्षणिक सत्र उशिरा सुरू होत आहे. प्रवेशाच्या चार फेरी होणार आहेत. प्रत्येक फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगइनद्वारे पसंतीनुसार प्रवेश स्वीकारणे आवश्यक आहे. त्यासाठी “फ्रीझ” किंवा “बेटरमेंट” असे दोन पर्याय उपलब्ध असतात. जर विद्यार्थ्याला मिळालेले फार्मसी महविद्यालय पसंत असेल तर तो फ्रीझ पर्याय निवडून ती जागा निश्चित करू शकतो. मात्र विद्यार्थ्याला पुढील फेरीत यापेक्षा चांगले महाविद्यालय मिळावे अशी अपेक्षा असेल तर त्याने बेटरमेंट पर्याय निवडणे गरजेचे आहे. पहिल्या पसंतीचे महविद्यालय मिळाल्यास तो प्रवेश आपोआप “ऑटो फ्रीझ” होईल आणि अशा विद्यार्थ्यांना पुढील फेर्यांत सहभागी होता येणार नाही. तसेच प्रवेश कर्न्फम करताना ऑनलाईन शुल्क भरणे बंधनकारक आहे. चुकीची कागदपत्रे सादर केल्यास उमेदवाराचा प्रवेश नाकारला जाईल, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. गतवर्षी देखील बी.फार्मसी प्रवेशप्रक्रियेत अशीच अडचण होती. प्रवेश उशिरा आणि विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे प्रवेश रखडले होते.
डी फार्मसीची अजूनही प्रतिक्षाच असणार आहे. 33 हजार विद्यार्थ्यानी आतापर्यंत अर्ज केले आहेत. मात्र अजूनही महविद्यालयांची मान्यता प्रक्रिया झालेली नाही. राज्यातील फार्मसी पदविका संस्थांनी येत्या 24 सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची सर्व माहिती अद्ययावत करावी, असे स्पष्ट निर्देश तंत्रशिक्षण संचालनालयाने दिले आहेत. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया या शिखर परिषदेद्वारे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम राबविणार्या संस्थांची मान्यता प्रक्रियेची कार्यवाही सुरू आहे.