Domino’s Pizza | डॉमिनोजचे पाच परवाने ‘एफडीए’कडून निलंबित

गोंदियातील ४ आयुर्वेदिक कंपन्यांवरही कारवाई
Domino’s Pizza
Domino’s PizzaPudhari
Published on
Updated on

मुंबई/गोंदिया : अन्‍न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) राज्यभरात अन्‍न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत कडक मोहीम राबवली जात आहे. आता एफडीएने आपला मोर्चा थेट मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सकडे वळवला असून, अन्‍नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 'डॉमिनोज् पिझ्झा'च्या मुंबईसह राज्यभरातील ५ आउटलेटचे अन्न व्यवसाय परवाने रद्द (निलंबित) केले आहेत. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातील ४ आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवानेही कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

मुंबई आणि सातारा जिल्ह्यातील डॉमिनोज् पिझ्झाच्या आऊटलेट्समध्ये एफडीएच्या पथकाने अचानक तपासणी केली. यात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. ज्यामुळे ५ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विलेपार्ले (मुंबई) आउटलेटमध्ये ग्राहकांना दिसावा यासाठी 'एफएसएसएआय' परवाना प्रदर्शित केलेला नव्हता.

पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या कोणत्याही नोंदी उपलब्ध नव्हत्या. घाटकोपरमधील आर-सिटी मॉल येथील आऊटलेटमध्ये कीटक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना व त्यांच्या नोंदी नव्हत्या. अन्‍न साठवणूक, तापमान नियंत्रण आणि स्वच्छतेचे निकष पूर्ण केलेले नव्हते. खाद्यपदार्थांच्या संपर्कात येणाऱ्या साहित्याची प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांच्या स्वच्छता आणि वैद्यकीय तपासणीच्या नोंदी ठेवलेल्या नव्हत्या. अन्‍न आणि पाण्याच्या चाचणीचे अहवाल सादर करण्यात आऊटलेट अपयशी ठरले. बोरिवली येथील आऊटलेटमध्येही अन्‍न साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता आणि खाद्यपदार्थ हाताळणीच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले. मुंबईव्यतिरिक्त सातारा जिल्ह्यातील कराड आणि मलकापूर येथील डॉमिनोज् पिझ्झाच्या आऊटलेटचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत.

गोंदियातील औषध कंपन्यांचे परवाने कायमचे रद्द

तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मे, जून व जुलै २०२६ दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील पाच आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची कसून तपासणी करण्यात आली. यापैकी चार कंपन्यांमध्ये औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० (नियम १९४५, परिशिष्ट-‘टी’) मधील तरतुदींचे अत्यंत गंभीर उल्लंघन झाल्याचे निष्पन्‍न झाले.

कायमस्वरूपी परवाने रद्द झालेल्या कंपन्यांमध्ये अंग्रास आयुर्वेद, आदित्य फार्मास्युटिकल्स, लालशाह सेंद्रिय उत्पादने, हिलॅरियस आयुर्वेद आणि याशिवाय गोंदियाच्या रेलटोली येथील 'पाठक आयुर्वेदिक फार्मसी'चा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news