

मुंबई/नागपूर : सिव्हिल लाईन्स परिसरातील डॉलीच्या दुकानात चहा पीत असताना गिट्टीखदान पोलिसांच्या विशेष पथकाने अनेक पुरुषांना किमान 4 ते 5 कोटींनी गंडविणार्या समिरा फातिमाला अटक केली. यावेळी तिच्यासोबत तिचा नववा पतीसुद्धा होता.
न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. समीराने आतापर्यंत किमान आठ विवाहित पुरुषांना फसवले आहे. समीरा फातिमाविरुद्ध पहिली तक्रार मार्च 2023 मध्ये दाखल करण्यात आली. तोपर्यंत तिने 2010 मध्ये इमरान अंसारी, 2013 मध्ये नजमुज साकीब, रहेमान शेख, 2016 मध्ये मिर्झा अशरफ बेग, 2017 मध्ये मुद्दसीर मोमीन, 2019 मध्ये मोहम्मद तारीक अनीस, 2022 अमानुल्लाह खान आणि 2022 मध्ये गुलाम गौस पठाण यांच्याशी लग्न केले. यात एकाची माहिती उपलब्ध नाही. ट्रॅव्हल व्यावसायिक गुलाम गौस पठाणची तिची फेसबुकद्वारे भेट झाली.
समीराने घटस्फोटित असल्याचे सांगून त्याच्याशी लग्न केले. त्यानंतर ती सतत भांडणे, खोटे आरोप आणि धमक्या देऊन पैसे उकळू लागली. लाखो रुपये उकळल्यानंतर तिने त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप केला. समझोत्याच्या नावाखाली मोठी रक्कम मागितली. विशेष म्हणजे समीरा स्वत:ला शिक्षिका म्हणवून घेत असे आणि सोशल मीडियावर बरीच सक्रिय होती. ती ‘मी घटस्फोटित असून मला तुमचा सहवास हवा आहे’ असे सांगून पुरुषांची सहानुभूती मिळवत असे. कोणताही पुरूष सहमत झाला की, ती त्याच्याशी लग्न करायची.