

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली येथे १८ मे २०२२ साली घडलेल्या एका घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. मुंबईच्या असलेल्या श्रद्धा वालकर हिचा अंत्यंत निघृण खून करण्यात आला होता. २७ वर्षीय श्रद्धाचे जवळपास ३५ तुकडे करुन ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. ही घटना सहा महिन्यानंतर उघडकीस आली होती. आफताब पूनावाला असे आरोपीचे नाव आहे. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी आफताबला अटक करण्यात आली होती. श्रद्धा व आफताब दिल्ली येथे लिव्ह इन मध्ये राहत होते. श्रद्धा हिचे वडिल विकास वालकर यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वसई येथे ते आपल्या परिवारासोबत राहत होते. (Shraddha Walkar murder Case)
या घटनेनंतर श्रद्धा हिच्या वडिलांना तिच्या मृतदेहाचे तुकडेही मिळाले नाहीत. आपल्या मुलीवर अंतिम संस्कार करण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. आज त्यांचेहि निधन झाले, श्रद्धा हिच्या मृतदेहाचे तुकडे करुन आफताब याने अनेक ठिकाणी फेकून दिले होते. हे अवशेष या हत्याकांडातील प्रमुख पुरावे आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांची ते कुटुंबाकडे सुपर्द केलेले नाहीत. त्यामुळे निदान मृतदेहाच्या वाचलेल्या अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्याचे विकास वालकर यांचे स्वप्न त्यांच्या मृत्यूने अपूर्णच राहिले.
श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने हॉलिवूड टीव्ही सीरीज डेक्सटर पाहून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली होती. त्याने श्रद्धाचे गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह बाथरूममध्ये नेला. त्याने दुसऱ्या दिवशी धारदार शस्त्राने मृतदेहाचे तुकडे केले आणि एक एक करत ते त्याने जंगलात फेकून दिले. त्याने एक ते दीड महिन्याच्या कालावधीत मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली होती. आफताब सुमारे ४ वर्षांपासून श्रद्धाच्या संपर्कात होता आणि सुमारे दोन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशीनशीपमध्ये होता.